इंडिया दर्पण विशेष – नवोदित
अव्वल रोइंगपटू मृण्मयी साळगावकर
खेळाला करिअर म्हणून स्विकारणारे मोजकेच असतात. त्यातही चमकदार कामगिरी करणारे त्याहूनही कमी. अव्वल रोइंगपटू मृण्मयी साळगावकर ही त्यापैकीच एक आहे. आज आपण तिच्याच लख्ख यशोप्रवासाचा वेध घेऊ…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
दहावीत तब्बल ९२% गुण मिळविलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणते करिअर निवडतील? या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे आहे.. सायन्सला प्रवेश घेऊन मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा तत्सम शाखेत नैपुण्य मिळवायचे. जगातील नामांकित कंपनीत उच्चपदाची नोकरी मिळवायची. तथापि या नियमाला नाशिकच्या मृण्मयी साळगांवकर या मुलीने छेद दिला. तिने चक्क रोइंग या फारशा लोकप्रिय नसलेल्या आणि ग्लॅमर नसलेल्या खेळाला वाहून घेतले आहे. या शिवाय तिने कत्थक नृत्यशैलीतही सात परीक्षा पास होऊन प्राविण्य मिळविले आहे हे विशेष .
आई-वडिलांचे पूर्ण प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे चाकोरीबद्ध शिक्षण सोडून तिने खेळात करिअर करायचे ठरवले. इतके गुण मिळवून आणि इयत्ता दहावीत ती शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेच्या पाठिंब्याने तिने ठरवून वेगळी वाट चोखाळली. त्यात तिला उत्तम यश मिळत आहे, असे निश्चित म्हटले पाहिजे.
आज वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ती भारतातील अव्वल चार महिला रोइंगपटूंमध्ये गणली जाते (कौर आडनाव असलेल्या नवनीत, अविनाश आणि खुशप्रीत या इतर तिघी). दोन दिवसांपूर्वीच थायलंड येथे झालेल्या आशियाई रोइंग स्पर्धेत या चौकडीचे पदक लाटा आणि वाऱ्यामुळे थोडक्यात हुकले.
अवघ्या सात वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत मृण्मयीने रोइंग मधील डबल आणि quadruple स्कल या आवडीच्या प्रकारात अनेक आशियाई, विद्यापीठ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. आपल्या दमदार कामगिरीने तिने संघाला आणि स्वतःला दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवून दिले आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्य, शिवाय राज्य स्पर्धेत असंख्य पदकांची लयलूट केली आहे. याद्वारे तिने नाशिकचे आणि विशेषतः Water’s Edge या क्लबचे, प्रशिक्षक अंबादास तांबे आणि इतर सहकार्याचे नाव मोठे केले आहे. माजी महापौर प्रकाश मते आणि विक्रांत मते यांच्या क्रीडाप्रेमाने आणि दूरदृष्टीने सुरु झालेल्या या क्लबने आतापर्यंत २०० च्या वर राष्ट्रीय रोइंगपटू दिले आहेत. तेही फक्त १७ वर्षात! मृण्मयीने तर ‘चार चाँद’ च लावले आहेत.
इतके यश मिळूनही तिचे पाय जमिनीवरच आहेत. कारण तिचे स्वप्न वरिष्ठ गटात सुवर्ण मिळावे इतके छोटेसेच आहे. कारण इतर अनेक खेळाडू किरकोळ यश मिळाले की, लगेच सरळ ऑलिम्पिक पदक मिळविण्याची बात करायला लागतात. मृण्मयीच्या यशस्वी कारकिर्दीत तिची हुशारी, मेहनत आणि कौशल्य याची चर्चा होईल. तथापि ती मनाने किती खंबीर आहे, या गुणाचीही अलीकडे चुणूक दिसून आली. दोन वर्षांपूर्वी तिच्यासह तीन वर्षांपासून सराव करीत असलेल्या कटक येथील खेलो इंडिया कॅम्प मधील इतर २२ खेळाडूंना डोपिंगच्या आरोपाला नाहक तोंड द्यावे लागले. पण मृण्मयीने हे बालंट अतिशय खंबीरपणे सोसले. त्यातून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा सरावावर लक्ष केंद्रित केले. आपल्या ध्येयाकडे पुन्हा तिने वाटचाल सुरु केली आहे. थायलंडमधील खेळाने ती परत योग्य मार्गावर वाटचाल करीत आहे, हे सिद्ध झाले.