इंडिया दर्पण विशेष – गुरुवे नमः
कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन
भारताची मक्तेदारी असलेल्या खेळात इराणला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय प्रशिक्षक शैलजा जैन यांचा आजवरचा प्रवास अफलातूनच आहे. त्यांनी घडविलेले खेळाडू आणि त्याद्वारे प्रतिबिंबीत होणारे यशच त्यांच्या कार्याची पावती देत आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
२७ ऑगस्ट २०१८ …कबड्डी ह्या संपूर्ण भारतीय खेळाला कलाटणी देणारा ऐतिहासिक दिवस ठरला. जाकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळात भारताची मक्तेदारी असलेल्या कबड्डीचा महिला संघाचा अंतिम सामना होता. त्यातील एक संघ अर्थातच भारताचा होता आणि भारताला प्रतिस्पर्धी कोणताही संघ असला तरी फरक पडणार नव्हता कारण शेवटी जिंकणारा संघ भारतच असणाऱ हे सर्वांनी गृहितच धरले होते .औत्सुक्य फक्त किति गुणांच्या फरकाने भारत विजयी होतो याचेच! पण एक व्यक्ती आणि तीही भारतीय मात्र वेगळाच विचार करीत होती. तिचे नाव शैलजा जैन. त्या भारतीय असूनही अंतिम सामन्यातील भारताविरूध्द खेळणाऱ्या इराण महिला संघाची प्रशिक्षक होत्या. त्यांना उपविजेतेपदात म्हणजेच रौप्यपदक मिळविण्यात रस नव्हता. त्यांचे ध्येयच मुळी इराणला सुवर्णपदक जिंकून देणे हे होते .
मूळच्या भारतीय असल्याने आणि भारतातील अनेक संघाना अनेक वर्षे कोचिंग केले असल्याने भारतीय खेळाडू, त्यांची बलस्थाने आणि मर्यादा, त्यांची मनोवृत्ती आणि स्वभाव जैन याना अंतर्बाह्य माहिती होतेच. या ज्ञानाचा त्यांनी उपयोग करायचे ठरवले आणि कबड्डी या खेळाची ४/५ वर्षांपूर्वी काही गंधवार्ताही नसलेल्या इराणी मुलींनी ‘ hot favourite ‘ भारतीय महिला संघाला चक्क २७-२४ अशी मात देत धूळ चारुन आशियाई विजेतेपदावर आपले नाव कोरले ! खर तर मध्यंतराला भारतीय संघ १३-८ असा पाच गुणांनी आघाडीवर होता पण जैन यानी दिलेल्या मह्त्वाच्या आणि उत्तेजनापूर्ण ‘ टिप्स’ मुळे इराणी महीलानी उत्तरार्ध गाजविला आणि सामना आपल्या बाजूने फिरविला तो तुफानी चढाया करीत, बोनस गुण घेत आणि मोक्याच्या क्षणी पकडी करीत. खरा प्रशिक्षक त्याला म्हणतात जो फक्त खेळाडूला फक्त तंत्र शिकवीत नाही तर खेळाडूत विजिगिषू मनोवृत्ती विकसित करण्याचा मंत्रही शिकवितो. जैन यानी इराण सारख्या सनातनी मनोवृत्तीच्या आणि फक्त कायम पडद्यातच राहाणार मुस्लिम महिलाना शिकविण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला तोड नाही.
“कबड्डीला बिलकूल न चालणारे असे न वाकनारे त्यांचे धिप्पाड शरीर . कबड्डी खेळ मैदानी आणि अंगावरील कपडे कमीत कमी घालणे कसे आवश्यक आहे हे मुस्लिम चालीरीतीच्या विरूध्द असल्याने त्यांच्यावर बिंबवण्याला खूपच कष्ट घ्यावे लागले आणि पुरषासमोर खेळावे लागेल हे पटविण्यासाठी मला सर्व माझी आयुधे वापरावी लागली पण मी महिला असल्याने माझे म्हणणे त्यांना पटले आणि त्या तसेच मुख्य म्हणजे इराण कबड्डी संघटनेतील पुरुष शेवटी राजी झाले आणि इतिहास घडला!” शैलजा जैन या मूळच्या विदर्भातील , तिथेच त्या खेळाडू म्हणून राष्ट्रीय आणि विद्यापीठ पातळीवर चमकल्या पण त्यांचे मन खरे रमले ते कोचिंगमध्येच.
१९८१ साली त्यांनी नाशिकच्या रचना विद्यालयात रचना स्पोर्ट्स क्लबच्या मुलींना ट्रेनींग ध्यायला सुरुवात केली आणि मागे वळून बघितलेच नाही. इराण महिलाचे सुवर्णपदक हा जऱी त्यांच्या कोचिंग कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण असला तरीही रचना आणि नाशिकच्या महिला संघाचा राष्ट्रीय पातळीवर दबदबा आणि दादागिरी निर्माण केली शैलजा जैन यानीच. भक्ती आणि तृप्ती कुलकर्णी, निर्मला भोई , पूनम पाटील, शीतल दाणे, रश्मी जैन , कोमल मोहिते इ अनेक रत्ने त्यानी तयार केली ती रचनाच्या ओबडधोबड मैदानावर. त्यांची ही कामगिरी बघून महाराष्ट्राच्या अनेक संघासह नेपाळच्या संघालाही त्याना कोच म्हणून भारतीय कबड्डी महासंघाने पाचारण केले पण राजकारणग्रस्त भारतीय कबड्डी महासंघाला मात्र हा हीरा नकोसा होता कारण त्याना आपल्या मर्जीतील आणि होयबा प्रशिक्षक हवे होते. तथापि खरी गुणी व्यक्ती फार दिवस लपून राहत नाही. शेवटी इराणने त्यांची योग्य पारख केली आणि त्याना अखेर न्याय मिळाला.