नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या काही दिवसापासून सर्व नाशिककर सीएनजीच्या गोंधळामुळे त्रस्त झाल्यामुळे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी MNGL कंपनीला नाशिक जिल्हयात सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत बोलतांना ठाकरे म्हणाले की, आम्ही देखील यात एक पेट्रोल पंप चालक म्हणून सीएनजी विक्रेते म्हणून अतिशय होरपळून निघालेले आहोत.MNGL ला वारंवार सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने आम्ही आज एमएनजीएलला २५ एप्रिल पर्यंत रोज निदान दहा तास सुरळीत सीएनजी पुरवठा न झाल्यास २६ एप्रिल पासून सीएनजी विक्री जिल्ह्यामध्ये बंद करण्याचा इशारा दिलेला असल्याचे सांगितले.
पेट्रोल डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएनजी पंप सुरु झाले. पण, त्यांना नियमीत पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये सुध्दा संताप आहे.