माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने सारेच धास्तावले आहेत. त्यामुळेच या आठवड्यात हवामान कसे राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता उद्यापासून थंडीमध्ये वाढ होणार आहे. म्हणजेच, किमान तपमानात घट होणार आहे. चक्रीवादळामुळे हिरावून घेतलेली थंडी आता परतणार आहे.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसातील थंडी चक्रीवादळाने हिरावून घेतली. मॅन-दौंस चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरले आहे. उत्तर भारतात एका पाठोमाग एक संचलनित असलेल्या पश्चिमी झंजावाताच्या (वेस्टर्न डिस्टरबन्सेस) परिणामामुळेच सध्याचे महाराष्ट्रातील किमान व कमाल दोन्हीही तापमाने गेल्या दोन दिवसांपासून हळूहळू घसरत आहे. तरीदेखील अजूनही ते त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा २ डिग्रीने वाढीवच आहे. त्यात घसरण होऊन रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होईल.
उद्या, मंगळवार, २० डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून १० डिग्री पर्यंत तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होवून २९ डिग्रीपर्यंत स्थिरावू शकतात, असे वाटते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित १०-१२ दिवसात थंडीत चांगलीच वाढ होण्याची चिन्हे आहेत. ही थंडी कदाचित शनिवार दि.३१ डिसेंबर पर्यंतही टिकून राहू शकते, असे वाटते.
बंगालच्या उपसागरातील सध्या श्रीलंका पूर्व किनारपट्टीवर असलेले आणि तामिळनाडूकडे येत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या वातावरणाचाही महाराष्ट्रात जाणवणाऱ्या या थंडीवर विशेष काही नकारात्मक असा परिणाम जाणवणार नाही. असे वाटते.
दरम्यानच्या काळात म्हणजे २०ते ३१ डिसेंबर या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यताही जाणवत नाही.
महाराष्ट्रासारखाच थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातमधील (द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाड पर्यंतच्या) २० जिल्ह्यात आणि दक्षिण मध्य प्रदेशातीलही (झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुल पर्यंतच्या) २० जिल्ह्यात जाणवू शकतो.
दरम्यान, वातावरणात काही बदल जाणवल्यास तसे तातडीने सांगितले जाईल.
Climate Weather Cold Forecast Winter