नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर तसेच शहर हद्दीपासून २० किमी अंतरापर्यंत बससेवा पुरविण्यात येते. यातीलच मार्ग क्रमांक २५६ नाशिकरोड ते हिंगनवेढा मार्गे सामनगाव, कोटमगाव या मार्गावरील बससेवा काही कालावधीकरीता स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सीटीलिंक प्रशासनाने दिली आहे.
सद्यस्थितीत चाडेगाव याठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्याकारणाने येथील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे पुढे मार्गस्थ होण्याकरिता पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नसल्याकारणाने मार्ग क्रमांक २५६ नाशिकरोड ते हिंगनवेढा मार्गे सामनगाव, कोटमगाव या मार्गावरील बससेवा हि तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. याची कृपया प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.
तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाश्यांनी पास काढलेले आहेत अश्या प्रवाश्यांना न वापरलेल्या दिवसांच्या पासचे पैसे सिटीलिंक कार्यालयाकडून परत करण्यात येतील. अश्या प्रवाश्यांनी सिटीलिंक कार्यालयाशी संपर्क साधून पास संदर्भातील माहितीसह रीतसर आपला अर्ज कार्यालयाकडे जमा करावा असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.