मुंबई – तळीरामांसाठी वर्षाअखेरीस चांगलीच खुशखबर आहे. खासकरुन विदेशी मद्य महागडे असल्याने देशीवरच समाधान मानणाऱ्यांना तर अत्यंत फायदेशीर वृत्त आहे. राज्यातील तळीरामांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे.
राज्य सरकारने विदेशी दारुवरील एक्साईज ड्युटीमध्ये मोठी कपात केली आहे. ३०० टक्के असलेली एक्साईज ड्युटी राज्य सरकारने आता १५० टक्के केली आहे. अचानक सरकारने हा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. सरकारने महसूल बुडविण्यासाठी नाही तर तो वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
एक्साईज ड्युटीत कपात झाल्याने इतर राज्यांमधून होणारी स्कॉच व बिअरची तस्करी तसेच बनावट दारुच्या विक्रीला आळा बसेल, अशी सरकारला वाटते. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात व्हिस्की, स्कॉच, बिअरच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्यात सध्या जवळपास १ लाख विदेशी मद्याच्या बाटल्यांची विक्री होते. आता दर कमी होणार असल्याने हीच विक्री अडीच पटीने वाढण्याची खात्री सरकारला आहे.
राज्य सरकारने हा निर्णय घेऊन महिना लोटला तरी तळीरामांना त्याचा फायदा होत नव्हता. कारण, दुकानांमध्ये जुन्या किंमतीच्या मद्य बाटल्या होत्या. हा स्टॉक आता जवळपास संपत आला आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशनमध्ये तळीरामांना आता कमी किंमतीतील विदेशी मद्य उपलब्ध होणार आहे.