नाशिक – देशात सैनिकी शिक्षणाची बीजे पेरणाऱ्या धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांच्या सार्धशती (१२ डिसेंबर) (१५०वी जयंती) चे औचित्य साधत सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्राबाहेर झेप घेण्याचे ठरविले आहे. संस्थेतर्फे अरूणाचल (रिवांग) प्रदेशात एनडीए प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु होणार आहे. २०२४ अरुणाचल मध्ये सैनिकी स्कुल सुरु करण्याची योजना आहे. याचबरोबर आसाममध्ये सुद्धा सैनिकी स्कुल सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सार्धशतीच्या निमित्ताने सैनिकी शिक्षणाचे अद्यावतीकरण व आधुनिकीकरण करण्याचा संकल्प संस्थेने सोडला असून डिसेंबर २०२१-२२ या वर्षात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष लेप्टनल जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर हे पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. बेलगांवकर यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, संस्थापक धर्मवीर डॉ. बा.शि.मुंजेचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असे होते. त्यांचे हे पैलू सर्वांच्यासमोर यावेत, या उद्देशाने सार्धशती वर्षाचे औचित्य साधत `डॉ.मुंजेच्या राष्ट्रकार्याची विधायक साधने` या आशयाखाली दर महिन्यांच्या बारा तारखेला पुस्तिका प्रसिध्द केली जाईल. त्यासाठी १) सैनिकी शिक्षण व भोसला मिलीटरी स्कूलची स्थापना २) संरक्षण विषय ३) सामाजिक सुधारणेचे प्रयत्न ४) गोलमेज परिषदेतील भाषणे ५) आय.एम.ए.ची स्थापना ६) पंडित मालवीय,लोकमान्य टिळक,महात्मा गांधी,स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेबरोबरचे कार्य ७) राजकीय विचार ८) नेत्र शल्यविशारद ९) बोर युध्द १०) परदेश प्रवास ११) राजकीय विचार व दिशा १२) डॉ. मुंजे अँज ए स्ट्रॅटेजिस्ट हे विविध विषय ठरले असून या पुस्तिकेसाठी तज्ञ लेखकांकडून लेख मागविले आहे. या विषयांच्या अनुषंगाने मान्यंवर लेखक पुढील वर्षभर लेखांवर आधारीत भाषणांद्वारे संवाद साधतील. या सर्व पुस्तिकांच्या एकत्रित संग्रहाचे प्रकाशन १२ डिसेंबर २२ ला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. सैनिकी शाळांसाठी पाठ्यपुस्तके: सैनिकी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे अद्यावतीकरण व आधुनिकीकरण्यास संस्थेने प्राधान्य देत वर्षभरात सैनिकी शिक्षणाची पाठ्युपुस्तके तयार करण्याचे संस्थेने ठरविले आहे.
डॉ.मुंजेच्या जीवनकार्याची वेबसाईटची: डॉ.मुंजेच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी स्वतंत्र वेबसाईटची निर्मिती केली असून तिचे अनावरण सार्धशतीचे औचित्य साधून उद्या (ता.१२) होत आहे. चरित्राचे इंग्रजी भाषांतर: महापोध्याय बाळशास्त्री हरदास यांनी लिहिलेल्या डॉ.मुंजेच्या चरित्राचे इंग्रजी भाषांतर करणे व डॉ.मुंजे यांच्यावर हरदास यांनी लिहिलेल्या चरित्राचे आकाशवाणीवर वाचन करण्यासाठीचा प्रस्ताव आकाशवाणीकडे दिला आहे.
डॉ. मुंजे नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण केंद्र: संस्थेच्या डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट मध्ये वर्षभरात डॉ. मुंजे नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण केंद्र हे मूर्त स्वरूपात आणण्याची योजना आहे.
जहाज बांधणी वेबिनार : भोसला मिलीटरी कॉलेजच्या कामरी विभागाने जहाज बांधणी या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर वेबिनार घेतला. त्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेकटकर, इंडियन मेरीटाईम युनिर्व्हसिटीच्या कुलगुरु मालिनी शंकर यांच्यासह विविध मान्यंवरांनी सहभाग घेत संवाद साधला.
डॉ. मुंजे व्याख्यानमाला परंपरा
डॉ.मुंजेच्या जयंतीनिमित्त होणारी स्मृती व्याख्यानमाला हा एक संस्थेचा उल्लेखनीय उपक्रम आहे असे नमूद करून डॉ. बेलगांवकर म्हणाले, यंदाही कोविडचे सर्व नियम पाळून ही परंपरा जपली जाणार आहे. या व्याख्यानमालेंसाठी आतापर्यत सैनिकी क्षेत्रातील नावाजलेल्या उच्चतम अधिकाऱ्यांनी हजेरी लावत संवाद साधला आहे. यंदाच्या व्याख्यामालेत रविवारी(ता.१२) मेजर जनरल(निवृत्त) गगनदीप बक्षी हे २०३० मधील भारताचे भौगोलिक राजकारण, सोमवारी (ता. १३) संरक्षणशास्त्रतज्ञ नितीन गोखले हे २०३० मधील इंडो पॅसिफिक भूराजनीती, मंगळवारी (ता.१४) व्हाईस अँडमिरल(निवृत्त) सोनिल भोकरे २०३० मधील भू-राजनीती: NBC परमाणू, जैविक आणि रासायनिक युद्ध या अनुषंगाने मांडणी करणार आहेत
समारोप सोहळा
सार्धशतीचा डिसेंबर २०२२ मध्ये होणारा समारोप सोहळा नाशिक मध्ये होणार असून वर्षभरात दिल्लीसह ,नागपूर या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
डिफेन्स जर्नालिझम,फोटोग्राफी आणि ड्रोनचा अभ्यासक्रम
डॉ.बेलगांवकर म्हणाले, युवकांचा सैनिकी शिक्षण व पत्रकारीतेकडे वाढता ओढा लक्षात घेऊन संस्थेतर्फे बारावीनंतर तीन वर्षाचा युजीसी मान्यताप्राप्त बी.व्होकअंतर्गत बॅचलर ऑफ डिफेन्स जर्नालिझम आणि त्याजोडीला सहा महिन्याचा सर्टिफिकेट इन वॉर अँन्ड कॉन्फिक्ट फोटोग्राफी हा अभ्यासक्रम लवकरच सुरु होत आहे. फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींगमध्ये ड्रोनचा सहभाग सुध्दा सर्वांना आकर्षीत करून लागला असून त्याचेही प्रशिक्षण हे आम्ही देणार आहोत.
नागपूर स्कूलमध्ये भव्य पुतळा
नागपूर आणि डॉ.मुंजे यांचे एक अतुट नाते आहे. संस्थेने नागपूरकरांसाठी सैनिकी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंजेचे कार्य दिपस्तंभासारखे सर्वांसमोर कायम रहावे,यासाठी नागपूरमध्ये भोसला स्कूलमध्ये डॉ.मुंजेच्या प्रतिमेचे शिल्प स्थापित करण्याचे ठरले आहे. शिवाय स्कूलमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंजे रन आणि बॅन्ड स्पर्धेचे आकर्षण
देशाच्या क्रीडाक्षेत्राला संस्थेच्या खेलो इंडिया आणि भोसला स्पोर्टस् अकादमीने छत्रपती पुरस्कार विजेती कविता राऊत, संजीवनी जाधव, ताई बामणे, किसन तडवी, पूनम सोनुने यासारखे नावाजलेले धावपटू दिले आहे, भोसला म्हणजे धावपटू घडविणारी एक खाण, नावाजलेली संस्था म्हणून देशस्तरावर परिचित आहे. आगामी काळात डॉ.बा.शि.मुंजे रन घेण्याचे नियोजन आहे. यावर्षी शालेय,महाविद्यालयीन स्तरावर फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय विविध क्रीडा स्पर्धांचा महोत्सव होणार आहे.सैनिकी बॅन्डची स्पर्धा हे देखील या वर्षातील वेगळे आकर्षण राहिल
भोसला करिअर अकादमी
सार्ध शती वर्ष म्हणून सागरी पोलीस प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र, सैन्य दल सेवा निवड मुलाखत प्रशिक्षण, संरक्षणासाठी नर्सिंग शाखा याचे नियोजन आहे. –