नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना सेबी या भांडवली बाजार नियामक संस्थेने नोटीस जारी केली आहे. शेअर बाजारात कामकाजात कसूर केल्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना ३.१२ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. यामध्ये व्याज आणि वसुलीच्या खर्चाचा समावेश आहे.
चित्रा रामकृष्ण ह्या आगामी १५ दिवसांच्या आत पैसे भरण्यास अपयशी ठरल्या तर त्यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून बँक खाते सील करावेत, असा इशारा सेबीच्या नोटिशीत देण्यात आला आहे. सेबीने ११ फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात रामकृष्ण यांना तीन कोटींचा दंड ठोठावला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या संचालकपदी असताना आनंद सुब्रमण्यम यांना समुह परिचालन अधिकारी आणि सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासह कंपनीची गोपनीय माहिती हिमालयात राहाणाऱ्या एका अज्ञात ‘योगी’ला सामायिक केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला होता.
या प्रकरणी सेबीच्या अहवालावरून सीबीआयने रामकृष्ण यांना अटक केली होती. प्राप्तीकर विभागाने रामकृष्ण यांच्या मुंबई आणि चेन्नई येथील ठिकाणांवर छापेही मारले होते. त्यांचे कथित सल्लागार आणि समुह परिचालन अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांनाही सीबीआयने अटक केली होती. २०१० ते २०१५ या काळात एनएसईमध्ये अनियमितता आढळून आली होती. त्या काळात रामकृष्ण या कंपनीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. २०१३ पर्यंत रवी नारायण हे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्याकारी अधिकारी होते. एप्रिल २०१६ मध्ये चित्रा यांनी नारायण यांची जागा घेतली होती.