बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून भारतातील कोरोना परिस्थितीची खिल्ली उडवली आहे. परंतु खिल्ली उडवून भारताची प्रतिमा खराब करण्याचा चीनचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आहे.
सीएएनच्या वृत्तानुसार, भारतातील कोविडच्या परिस्थितीची थट्टा करण्याचा प्रयत्न ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आला, ते चीनच्या सत्तारूढ पक्षाचा प्रभावशाली भाग असलेल्या सेंट्रल कमिशन फॉर पॉलिटिकल अँड लिगल अफेअर्सचा आहे.
चीनच्या वेबो या सोशल मीडियावर चीनच्या एका क्षेपणास्त्राच्या स्फोटासह भारतात रात्री जळत असलेल्या चितांचा फोटो व्हायरल करण्यात आला. चीनकडून आग लावणे विरुद्ध भारताकडून आग लावणे अशा ओळी फोटोच्या खाली देण्यात आली. यासोबतच भारताने एका दिवसात कोविडचे ४ लाख रुग्ण झाल्याची घोषणा केली आहे, असा हॅशटॅग लावण्यात आला. या फोटोला चीनच्या इतर सरकारी अकाउंटवर शेअर करण्यात आला.

परंतु चीन सरकारच्या निर्लज्ज वर्तनाबाबत सोशल मीडियाच्या युजर्सना धक्काच बसला. मला विश्वास बसत नाहीये की हा फोटो चीन सरकारच्या एका अकाउंटवरून व्हायरल करण्यात आला, अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली. दुसऱ्या देशाच्या दुःखात आपल्या देशाचा गौरव सांगण्याची गरज का निर्माण झाली, असे एक युजर म्हणाला. तर या फोटोला सेंसरकडून मंजुरीच कशी मिळाली. मानवी जीवनाचा हा अपमान आहे, असा संताप एकाने व्यक्त केला. सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सचे प्रमुख संपादक ह्यू जियान यांनीही ही सर्वात खराब पोस्ट असल्याचे म्हटले आहे. चीनच्या कोणत्याही सरकारच्या अधिकृत अकाउंटवरून भारताची अशाप्रकारे थट्टा करणे अयोग्य आहे, असे त्यांनी सांगितले.
वेबोवर चीनी नागरिकांनी या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर पोस्ट हटविण्यात आली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश देत कोविडच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मदतीचा हात दिला होता. जागतिक महामारीविरोधात सहकार्य करण्यासाठी आपण भारतासोबत आहोत, असेही ते म्हणाले होते.