नवी दिल्ली – जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि विस्तारवादी धोरणाने सर्वांच्या नाकात दम करणार्या चीनला एक चिंता सतावत आहे. चीनला कशाची चिंता असेल हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही खरी बाब आहे. आतापर्यंत लोकसंख्येचे विक्रम मोडणार्या चीनला लोकसंख्या कमी होण्याची भीती वाटत आहे. चीनमधील तज्ज्ञांना असे का वाटते हे जाणून घेऊया.
चीनमध्ये जन्मदर घटत असून, तेथील नागरिकांच्या लग्नाचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लोकसंख्येचे संकट गडद झाले आहे. चीनच्या स्टॅटिस्टिकल इयरबुक २०२१ मध्ये देण्यात आलेल्या आकडेवारीत हा खुलासा झाला आहे.
चीनमध्ये गेल्या सात वर्षांपासून विवाह नोंदणी घटत आहे. ही संख्या गेल्या १७ वर्षांमधील खालच्या स्तरावर पोचली आहे. नागरिक प्रकरणाच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये २०२१ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण ५८.७ लाख जोडप्यांनी विवाह केला. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या समान काळापेक्षा थोडी कमी आहे. चीनच्या चायना डेली या सरकारी वर्तमानपत्राने बुधवारी सांगितले की, चीनमध्ये २०२१ या वर्षामधील विवाह नोंदणीची संख्या कमीच राहणार आहे. स्टॅटिस्टिकल इयरबुकच्या माहितीनुसार, घटत्या जन्मदराचे आणखी एक कारण आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी जन्मदर ०.८५२ टक्के होता. सन १९७८ नंतर हा दर प्रथमच खाली आल्याचे निदर्शनास आले.
लोकसंख्येचे हे संकट गडद होत असल्याचे पाहून चीनने अनेक दशकांपासून राबविले जात असलेले एका मुलाचे धोरण समाप्त केले आहे. २०१६ मध्ये सर्व जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली होती. तर या धोरणात संशोधन करून दांपत्यांना तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसर्या मुलाबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या एका दशकाच्या जनगणनेनंतर घेण्यात आला. अधिकार्यांच्या अंदाजानुसार चीनची लोकसंख्या सर्वात कमी वेगाने वाढत आहे. चीनची लोकसंख्या १.४१२ अब्ज झाली आहे. विवाह नोंदणीत घट झाल्याच्या कारणांना अधोरेखित करून लोकसंख्या तज्ज्ञ हे याफू यांनी चीनमधील युवकांची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले आहे.
चीनमधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अतिदबाव आणि महिलांच्या शिक्षणाचा स्तर सुधारल्यामुळे तसेच आर्थिक स्वातंत्र्याच्या कारणांमुळे युवकांमध्ये विवाह करण्यास उदासीनता आली आहे. चीनमधील महिला आणि पुरुषांचे असमान गुणोत्तर हेसुद्धा एक कारण आहे. चीनच्या सातव्या राष्ट्रीय जनगणनेनुसार पुरुषांची संख्या महिलांपेक्षा ३.४९ लाख अधिक आहे. यापैकी विवाहायोग्य वयाच्या महिलांच्या तुलनेत २० वर्षांचे १.७५ लाख पुरुष अधिक आहेत. तसेच घरांच्या वाढत्या किमती आणि महागडे निवासीय संकुल हेसुद्धा विवाह करण्यात आणि मुलांना जन्म देण्यात बाधा ठरत आहेत.
तज्ज्ञ सांगतात, चीनमध्ये लग्न आणि मुलांच्या जन्मात आपसात घनिष्ठ संबंध आहेत. लग्नानंतर जन्म झालेल्या मुलांचे गुणोत्तर कमी आहे. त्यामुळे विवाह नोंदणीमध्ये घट झाल्याचा जन्मदरावर नकारात्मक परिणाम होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सुधारात्मक उपाययोजना वेगाने करणे आवश्यक आहे. लग्नाला आणि मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लग्नाची आणि प्रसूतीची रजा वाढविणे आवश्यक आहे. चीनमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या यापूर्वीच २६.४ लाख झाली आहे. ही एकूण लोकसंख्येच्या १८.७ टक्के आहे. वास्तविक सन २०३६ मध्ये वरिष्ठ नागरिकांची लोकसंख्या चीनच्या एकूण लोकसंख्येच्या २९.१ टक्के होण्याची शक्यता आहे.