नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चंदनाची चोरीवर आधारीत पुष्पा चित्रपट सर्वत्र गाजला, असाच पुष्पा सध्या नाशिकमध्ये धुमाकूळ घालत असून तो शासकीय बंगल्यातून चंदनाची चोरी करत असल्याचे समोर आले आहे. हा चोर अधून मधून ही चोरी करतो, त्यामुळे पोलिसांच्या हाती तो लागत नाही. या चोराने आता विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्याचे दुस-यांदा धाडस केले आहे. या चोरीप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील याच शासकीय बंगल्यातून चोरी झाली होती. चोरट्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश करून चंदनाच्या झाडाचे लंपास केले आहे. आयुक्तांच्या बंगल्यापासून काही अंतरावरच मुंबई नाका पोलीस ठाणे असतांना चोरट्यांनी ही चोरट्यांनी हे धाडस केले आहे. काही दिवसापूर्वी पोलीस अधिक्षक यांच्याही बंगल्यातून यापूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे थेट शासकीय अधिकाऱ्यांनाच हा नाशिकचा पुष्पा लक्ष करीत असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. चंदन चोरीच्या घटना यापूर्वी देखील अनेक वेळेला नाशिक शहरात घडलेल्या आहेत. यातही चोरट्यांने शासकीय कार्यालय, शासकीय बंगले हेच लक्ष केले आहे.