नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवे वर्ष फलदायी ठरणार आहे. हे काही राशिभविष्य नसून ते वास्तव आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात दोन गिफ्ट मिळणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा फायदा या कर्मचाऱ्यांना होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगात मिळणारा महागाई भत्ता (DA), महागाई सवलत (DR) वाढण्याची शक्यता असताना, आता घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता नवीन वर्षात पुन्हा वाढू शकतो. यासंदर्भात येणारे अहवाल पाहिल्यास कर्मचाऱ्यांना आणखी फायदा होणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. या कारणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ होते. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट घटकांवरून ठरवले जाते. म्हणजेच त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यात किती वाढ होईल ? आणि तो कधी जाहीर होईल ? हे सांगणे कठीण आहे. पण महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, येत्या २०२२ च्या अर्थसंकल्पात देखील फिटमेंट फॅक्टर देखील ठरवले जाण्याची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पीय खर्चात समावेश केला जाईल.
आपण किमान मूळ पगाराची गणना पाहिली तर ज्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. आतापर्यंत ३१ टक्क्यांनुसार त्यांना ५,५८० रुपये दरमहा महागाई भत्ता मिळतो. डीए ३४ टक्के झाल्यानंतर हे दरमहा ६,१२० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ५४० रुपयांनी वाढणार आहे. वार्षिक पगारावर नजर टाकली तर त्यात ६, ४८० रुपयांची वाढ होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कमाल मूळ पगारातही फायदा होणार आहे. सध्या ज्यांचा मूळ पगार (बेसिक) ५६,९०० रुपये आहे. सध्या ३१ टक्क्यांनुसार त्यांना १७,६३९ रुपये प्रति महिना डीए दिला जातो. तसेच ३४ टक्क्यांनुसार डीए काढला तर तो दरमहा १९,३४६ रुपये होईल. म्हणजेच त्यात १,७०७ रुपयांनी वाढेल. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक आधारावर २०,४८४ रुपयांनी वाढ होणार आहे.