नवी दिल्ली – तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कसे कोसळले, याचा शोध लावण्यासाठी ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू झाली आहे. यादरम्यान निलगिरीमध्ये बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी त्याचा व्हिडिओ काढणार्या व्यकीचा मोबाईल जप्त करून कोयंबतूर पोलिसांनी तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. या दुर्घटनेत सीडीएस रावत, त्यांची पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला होता.
पोलिस म्हणाले की, दुर्घटनेच्या तपासाच्या उद्देशाने मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलचे मालक कोयंबतूर येथील एक छायाचित्रकार आहे. ते आणि त्यांचे मित्र ८ डिसेंबर रोजी निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी परिसरात उपस्थित होते. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी त्याचा व्हिडिओ बनवला होता. त्या जंगलात प्राण्यांचा मुक्त संचार असल्याने सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ते आणि त्यांचे मित्र त्या दिवशी इतक्या दाट जंगलात का गेले होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
फुटेजमध्ये दिसत आहे की, हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर दाट धुक्यामध्ये अचानक गायब होते. हेलिकॉप्टर पडण्याचा जोरदार आवाजही येतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी कोणतीही अटकळ बांधू नये असे आवाहन हवाई दलाने केले होते. तसेच हवाई दलाने ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे गठन केले होते.
या दुर्घटनेत जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याशिवाय ब्रिगेडियर एल एस लिड्डर, लेफ्टिनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, स्क्वॉड्रन लिडर कुलदीप सिंग, ज्युनिय वॉरंट अधिकारी राणा प्रसाद दास, जेडब्ल्यू अरक्कल प्रदीप, लांसनायक विवेक कुमार, लांसनायक बी. एस तेजा, हवालदार सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग आणि जितेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वाचले असून, त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.