विशेष प्रतिनिधी, मुंबई
ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची अंतर्गत (इंटर्नल) परीक्षा दिली नसेल त्यांना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोरोनामुळे किंवा इतर काही कारणांनी परीक्षा देण्यास असमर्थ ठरले असतील तर अश्या विद्यार्थ्यांच्या १०वी, ११वी व १२वीतील गुणांच्या आधारावर त्यांचा निकाल तयार करण्यात येईल, असे सीबीएसईने म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना या निर्णयाचा विशेष लाभ होणार आहे.
सीबीएसईतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परीक्षा देणे शक्य झाले नाही. कारण कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर होती. त्यात विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट आले. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकन परीक्षांमध्येही ते सामील होऊ शकले नाही. पण आता आपले काय होणार, ही चिंता विद्यार्थ्यांना सतावत होती. आपल्या निकालावर परिणाम झाला तर भविष्यात चांगले शिक्षण घेण्यापासून आपण वंचित राहू, असे या विद्यार्थ्यांना वाटत होते. पण आता सीबीएसईने विद्यार्थ्यांची चिंता दूर केली आहे.
दिव्यांगांना दिलासा
सीबीएसईने नव्या नियमांतर्गत दिव्यांगांनाही मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील अंतर्गत मूल्यांकन परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. त्यांना शाळा परीक्षा देण्यासाठी बोलावणार देखील नाही. या विद्यार्थ्यांचा निकालही मागच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर ठरविण्यात येणार आहे.
गुणांचे सत्यापन अशक्य
बोर्डाने २०२०-२१ साठी हे स्पष्ट केले आहे की, शाळेच्या पुनर्मूल्यांकन आणि गुणांचे सत्यापन विद्यार्थ्यांकडून करणे शक्य नाही. एवढेच नाही तर एकदा गुण ठरविल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखविणेही शाळेला बंधनकारक नसेल. सीबीएसईने शाळांना तशी परवानगीच दिलेली नाही.