फरीदाबाद – गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. अनेक राज्यांमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक त्रास यासारख्या घटना घडत आहेत. काही वेळा त्या उघडकीस येतात, तर काही वेळा लाजेस्तव त्या समाजापुढील येतच नाहीत. अनेक वेळा महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे नात्यातील व्यक्तीच असतात. त्यामुळे हे प्रकरण दाबले जाते.
अलीकडच्या काळात मोबाईलचा वापर करून गरीब, निराधार आणि अबला महिलांचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडत आहेत उत्तर प्रदेशात अशीच एक घटना नुकतीच घडली. फरिदाबादमध्ये अश्लिल फोटो काढून व्हायरल करण्याच्या नावाखाली एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात तिच्या दिरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका २२ वर्षीय महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती स्नान करत असताना पतीच्या भावाने त्याच्या आणखी एका साथीदारासह बाथरूमच्या खिडकीतून अश्लील छायाचित्रे काढली. तसेच हे फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
इतकेच नव्हे तर त्यावेळी ती पाच-सहा महिन्यांची गरोदर होती. तरीही दोन्ही आरोपींनी तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच पीडितेने विरोध केला असता तिला मारहाण केली. त्याचप्रमाणे तिला, तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.