इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सलमान खानमुळे नशीब चमकलेली सना खान ‘बिग बॉस सीझन ६’मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वातच ती सलमान खानची आवडती स्पर्धक बनली होती. सना खानने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतरही कधी ब्रेकअप तर कधी निकाह, अशा अनेक कारणांमुळे सना खान नेहमीच चर्चेत राहिली आहे. सलमान खानसोबत ‘जय हो’ चित्रपटात सना खान दिसली होती. याशिवाय तिने ‘स्पेशल ऑपरेशन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. मात्र, नंतर सना खानने अचानक लग्न केले आणि बॉलिवूड विश्वाला अलविदा केला. लग्न करत स्वतः तिनेच आपले करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सना खान २१ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबईतील धारावी येथे १९८८ मध्ये सना खान हिचा जन्म झाला. तिची आई सईदा या मुंबईच्या रहिवासी आहेत. तर, तिचे वडील कन्नूरचे मल्याळी मुस्लिम आहेत. फार कमी वयातच तिने बॉलिवूड करिअर सोडण्याचा निर्णय घेत, एका धर्मगुरूसोबत लग्नगाठ बांधल्याने अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. सनाच्या नवऱ्याचे नाव मुफ्ती अनस आहे. तो गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. ‘बिग बॉस १४’चा स्पर्धक एजाज खान याने अनस आणि सना यांची पहिली भेट घडवली होती.
सना खानने २००५ मध्ये ‘ये है हाय सोसायटी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘धन धना धन गोल’ या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. सलमान खानसोबत ती ‘जय हो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर ‘वजह तुम हो’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात देखील ती झळकली.
सना खानचे नाव कोरिओग्राफर मेल्विन लुईससोबतही जोडले गेले. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मेल्विन लुईस हा एक लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. दोघेही त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. मात्र, अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सना डिप्रेशनमध्ये गेल्याची चर्चा झाली होती आणि एवढेच नाही तर तिने झोपेच्या गोळ्या घेतल्याचीही चर्चा होती. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.
मुफ्ती अनससोबत अचानक लग्न करून सना खानने लाखो चाहत्यांची हृदये तोडली. सना खानने लग्नाआधीच मनोरंजन क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती. अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर आता चालणार असल्याचे तिने म्हटले होते. वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ हा तिचा शेवटचा प्रोजेक्ट होता.
Bollywood Actress Sana Khan Life journey
Entertainment