पाटणा (बिहार) – चित्रपट सृष्टी असो की राजकारण याविषयी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. चित्रपटातील अभिनेत्री आणि अभिनेते यांनी विवाह केला तरी त्याची प्रचंड चर्चा होते. त्याचप्रमाणे राजकारणातील मंडळींच्या मुलांनी देखील विवाह केल्यास त्याचीही तितकी चर्चा होते. विशेषतः तो आंतरजातीय विवाह असेल तर सर्वत्र त्याबाबत उलट उलट सुलट चर्चा सुरूच असते. राजकारणातील अनेक बड्या नेत्यांच्या मुलांनी आंतरधर्मीय आणि अंतर जातियविवाह केले आहेत. त्यांना कुटुंबाकडून किंवा नातेवाईकांकडून विरोध झाला असून याचा त्यांना तीव्र सामना करावा लागला आहे. बिहार मध्ये देखील सध्या असेच काहीसे दिसत आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तथा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची जुनी मैत्रिण अॅलेक्सिस उर्फ राचेल गोडिन्हो हिच्याशी दिल्लीत लग्न केले. या लग्नाला लालू यादव यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित राहून सर्वजण आनंदी झाले. या लग्नावरून आता यादव कुटुंबांमध्ये महाभारत रंगले आहे. तेजस्वीच्या मामांचा या लग्नाला अद्यापही विरोध आहे. त्यामुळे यादव कुटुंबामधील मंडळी मामाश्रींवर चांगली संतापलेली दिसून येते.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा भाऊ साधू यादव या लग्नाबाबत सातत्याने नवरदेव तेजस्वी यादव आणि त्यांच्या नववधूवर निशाणा साधत आहे. तेजस्वीने यादवने दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न का केले? अशी विचारणा करीत साधू यादव यांची नाराजी व्यक्त आहे. लग्नाबाबत प्रश्न विचारताच साधू यादव भडकले. तेजस्वी बिहारमध्ये आल्यास त्याचे चप्पल आणि बूट दाखवून स्वागत करा, असेही ते म्हणाले. परिणामी, लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी हिने मामांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी हिने साधू यादव यांना ‘कंस मामा’ असे म्हटले आहे. तेज प्रताप यादव यांचे भोजपुरीमधील ट्विट रिट्विट करत रोहिणी यांनी लिहिले की, ‘आजही समाजात कंस आहेत, त्यांनी हे सिद्ध केले आहे. नाते टिकवायचे असेल तर कृष्ण व्हा, दुष्ट कंसासारखे अन्याय करू नका.’
दरम्यान, साधू यादव यांनी या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ख्रिश्चन मुलीशी लग्न का केले? असा सवाल केला होता. तेजस्वीने स्वतःच्या धर्मात लग्न का केले नाही? तुझ्या जातीतल्या मुलीशी लग्न का केलं नाहीस? अशी विचारणा केल्यामुळे यादव कुटुंबात प्रचंड संताप आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच लालूंनी आपल्या मुलींच्या लग्नात सर्वकाही पाहिले. घरच्यांना नेहमी लक्षात ठेवले, मग तेजस्वी यादवच्या लग्नात तू एवढी मोठी चूक कशी केलीस? साधूंच्या या आरोपांवर लालू यादव किंवा तेजस्वी यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.