निफाड – राजकीय बाण्यात निफाड तालुका हा नेहेमीच काटकोन त्रिकोण वापरत बिनचूक मारा करत असतो. सरत्या वर्षाला निरोप देत असताना निफाडमध्ये साजरा झालेला मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचा वाढदिवस अनेकांच्या राजकीय अपेक्षांना मुहूर्त रूप देणारा ठरून गेला. चार महिन्यांपूर्वी झालेल्या हेविवेट मविप्र निवडणुकीत परिवर्तन झाले अन् नितीन ठाकरे यांच्या गटाने सत्ता काबीज केली. मविप्रचे निवडणूक समीकरण हे निफाड शिवाय पूर्ण होत नाही हे जगजाहीर आहे. त्यांनीही यंदा छत्री हातात घेत प्रस्थापितांना मोठी चपराक दिली.त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वाढदिवशी सोहळा आयोजित करण्यात आला. त्यात हजारो लोकांनी उपस्थिती लावली. एरवी मविप्र संस्थेत राजकीय जोडे काढत सर्व नेते प्रवेश करतात त्यामुळे निफाडमध्ये त्याला लाभलेले व्यासपीठ मात्र येणाऱ्या वर्षात होऊ घातलेल्या अनेक निवडणुकांची नांदी ठरून गेली. क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांना लालदिवा सोडताच तितक्याच वजनाचं सभापती पद मिळाले. साहजिकच सरतं वर्ष हे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि क्षीरसागर यांच्या साठी विशेष ठरून गेले. राज्यात सुरु असलेल्या पक्षीय सोहळ्यात कोण कोणत्या पक्षात हे अद्याप व्यासपीठावर सर्वच नेत्यांनी हजेरी लावल्याने भाषणात खोडा होईल असे वाटले परंतु सर्वांनीच दिलखुलासपणे आपल्या भावना व्यक्त करत असताना काही पुढाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षात येण्याचे आमंत्रण देखील देऊन टाकले.एकूणच राजकीय सजगता अंगीकृत असलेल्या निफाड मध्ये सरत्या वर्षात सर्व संचालक नेते एकत्र आल्याने आगामी बजारसमित्या,जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी निवडणुकांबाबत दिलेल्या कोपरखळ्या मात्र २०२३ मध्ये कुणाच्या पथ्यावर पडतात हे बघणे रंजक ठरणार आहे.
राजकीय वावड्यांना पूर्णविराम
निफाडची आमदारकी म्हटली की मोठा कसबपणाचा खेळ समजला जातो.त्यात उपसभापती डी.बी मोगल यांनी क्षीरसागर यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या.त्याला उपस्थित मान्यवरांनी दाद देत शुभेच्छा दिल्या. मानसिक त्रास देणाऱ्यांना न विसरता दिव्याप्रमाणे काम करण्याचा संकल्प त्यांनी केला. पिंपळगावात बाजीगर ठरलेल्या सतीश मोरेंनी क्षीरसागर यांना राष्ट्रीय पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. दोनदा शिक्षक आमदारकी भूषवलेल्या नानासाहेब बोरस्ते यांनी राजकारणात संपर्क आणि संवाद राखण्याचा सल्ला दिला. अनिल कदम यांनी मात्र सतीश मोरेंनी दूरदृष्टी ठेवत दिलेला सल्ला त्यांच्या विशेष शैलीत परतून लावत मोरेना भाजप आमदारकीचे दावेदार ठेवणार असल्याचे सांगितले. हेविवेट पिंपळगाव बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत बेरीज सुरू झाल्याने आधी अनिल कदम अन् नंतर गोकुळ गीते आणि सतीश मोरेंनी सोबत केलेली एन्ट्री चर्चेत राहून गेली. बाळासाहेब क्षीरसागर यांनी आगामी लासलगाव बाजार समिती सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरणार असल्याचा मानस बोलून दाखवला. अनिल कदम यांनी निवडणूक लढवण्यासाठी सर्वांना मैदान खुले असल्याने जे जे इच्छुक आहेत त्यांनी अवश्य ती लढावी. तेरा वर्षांपूर्वी आर डी आप्पांच्या घरी उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांनी मला मोठी मदत केल्याचे सांगत आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटातच असल्याचे पुन्हा जाहीर भाषणात सांगितल्याने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय वावड्यांना वर्ष अखेरीस पूर्णविराम मिळाला.
सरचिटणीस नितीन ठाकरेंचा अभ्यासूबाणा विशेष चर्चेत
आमदारकीची चर्चा सुरू असताना संस्थेला आतापर्यंत लाभलेल्या सभापतींनी आमदार-खासदार पदापर्यंत मजल मारली. त्याचप्रमाणे बाळासाहेब क्षिरसागर देखील लवकरच आमदार होतील अशी आशा व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कृतज्ञता व्यक्त करताना ठाकरेंनी तालुका, गावं व प्रांतवादात न अडकता संस्थेच्या हिताचा विचार करणाऱ्या पॅनेलला सभासदांनी निवडून दिले त्यात आजी-माजी आमदारांनी पाठींबा दिला. सर्व सभासदांच्या दारापर्यंत गेलो त्याचे फळ मिळाले. संस्थेच्या माध्यमातून सभासद व सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. सर्वांना आश्वासक असे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु असून संस्थेचा करभार पारदर्शकपणे करण्यात सर्वोच्च प्राधान्य असून सभासदांसाठी मेडिकल कॉलेज २४ तास खुले असून त्यासाठी कोणत्याही वशिल्याची किंवा चिट्ठीची आवश्यकता नाही असे सांगून लवकरच संस्थेतील १४८ सेवकांना अनुदानीतकडे दिले जाईल तसेच संस्थेमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राध्यान्य दिले जाईल, सेवाजेष्ठता यादीनुसार कामे होतील असा विश्वास त्यांनी सरत्या वर्षात व्यक्त केला. निफाडचे जावई असलेल्या नितीन ठाकरेंनी केलेल्या मुद्देसूद भाषणाने सोहळ्याचा समारोप झाला.