अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पंढरपूच्या संत कैकाडी महाराज मठाचे मठाधीपती, मनमाडचे भूमिपुत्र, किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माची पताका फडविणारे प्रबोधनकार ह. भ. प.रामदास महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्काराची घोषणा केल्याबद्दल मनमाडमध्ये दिंडी स्वागत समिती व मिलिंद सामाजिक संस्था व तमाम मनमाडकरांच्यावतीने स्वागत करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करीत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रामदास महाराज यांच्या दिंडीची परंपरा कायम सुरू ठेवणाऱ्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कीर्तन व प्रवचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हभप रामदास महाराज यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.