जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रा. डी.डी बच्छाव व किरण बच्छाव यांच्या घरावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करीत पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लुटपाट करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड झाल्याने दरोडेखोरांनी पळ काढला.
अशी घडली थरारक घटना
सोमवारी रात्री ८.४५ वाजता किरण बच्छाव हे मागच्या खोलीत बसले होते. तर त्यांच्या पत्नी स्वयंपाकघरात होत्या व मुलगा टीव्ही बघत होता. वॉचमन कुत्र्याला फिरविण्यासाठी घेऊन गेला होता. रात्री ९ वाजता अचानक घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. वैदांती या दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी आतूनच काय काम आहे असे विचारले. कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन बाबा रस्त्यावर चक्कर येऊन पडले आहे, असे दोघांनी सांगितले. त्यामुळे काय झाले असावे ? या विचारातच वेदांती यांनी लागलीच दार उघडले. अन् दुसऱ्याच क्षणी हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला. त्यातील दोघांनी सुरूवातीला वैदांती यांचा गळा पकडून स्वयंपाक घरापर्यंत ओढत नेले. त्यामुळे त्या आरडा-ओरड करू लागल्या.
पुढच्या मुख्य दरवाजानेच घरातून पळ काढला
यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव दाम्पत्याला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला. किरण बच्छाव यांच्या मुलाला दरोडेखोर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर बच्छाव यांनी मुलाला काही झाले तर याद राखा असा इशारा दिला. या झटापटीत जोरजोरात आरडा-ओरड होत असल्यामुळे बाहेर उभा एक दरोडेखोर इतरांना लवकर निघा, लवकर निघा म्हणत होता. तेवढ्यात बच्छाव दाम्पत्याने आणखी जोरजोरात आरडा-ओरड केली. दरोडेखोरांनी घराचा मागचा दरवाजा कुठे आहे?, अशी विचारणा केली. बच्छावांनी मागे दरवाजा नाही, असे सांगितल्यावर दरोडेखोरांनी पुढच्या मुख्य दरवाजाने घरातून पळ काढला. दरम्यान, यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हेशाखा, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसांचा ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी पोहचला होता.