मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शाखा कोणतीही असो आरोग्य शिक्षण ही तपस्या असते. त्याच भुमिकेतून शिक्षण घेतले पाहिजे. यामुळे भविष्यातील कारकिर्दीला वेगळा आयाम मिळतो असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. विद्यापीठातर्फे मुंबई येथे श्रीमती सुनंदा प्रविण गंभीरचंद परिचर्या महाविद्यालयात ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु यांच्याबरोबर प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. वर्षा फडके, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव डॉ. नितीन कावेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य सेवा ही बहुमोल सेवा आहे. यामध्ये रुग्णांशी आपुलकीने संवाद होणे गरजेचे आहे. संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तंत्रज्ञान व माहितीच्या युगात विद्याथ्यांना सामाजिक मूल्यांची जाणीव करुन देण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. संलग्नित महाविद्यालयांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्नशील रहावे.
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्य शिक्षण घेतांना शिक्षण, संशोधन व सामाजिक बांधिलकी आदींचा विकास होणे गरजेचे आहे. संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठात ’दिशा’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यासाठी विद्यापीठाकडून रिसर्च ग्रॅंड उपलब्ध करुन देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक पुस्तके व जर्नल उपलब्ध करुन देण्यात आली आहेत त्यामुळे डिजिटल शिक्षणाला चालन मिळेल. डिजिटल हेल्थ फांउन्डेशन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रम करता येणे शक्य आहे. आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत, आरोग्या सेवा करतांना विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग समाजासाठी करावा असे सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आयुष विद्याशाखांची उपयुक्तता आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांनीच विविध उपक्रमांव्दारे सर्व सामान्य जनेतपर्यंत पोहचविले पाहिजे. ते पुढे म्हणाले आयुर्वेदातील संहिता वाचन महत्वपूर्ण ठरणारे आहे. प्रत्येक श्लोकामध्ये हजार शब्दांचा अर्थ सामावलेला असतो त्यासाठी सर्वकष अभ्यास असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संशोधन, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही पुढाकार घ्यावा. शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ‘कुलगुरु कट्टा’ हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी महाविद्यालय स्तरातून प्रोत्साहित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, प्रत्येक विद्याशाखेचा अभ्यासक्रम व पेपर पॅटर्न वेगळा असतो त्यासाठी टाईम मॅनेजमेंट तंत्राचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा जेणे करुन कमी वेळेत जास्त प्रश्न सोडविणे शक्य होईल. विद्यापीठाची निकाल प्रक्रिया जलद असून विक्रमी वेळेत निकाल देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असते असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, शैक्षणिक उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष संवाद यावा त्यांचे शैक्षणिक समस्या, अडचणी समजून घेता याव्यात यासाठी मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून कुलगुरु कट्टा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. देवेंद्र पाटील मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक कुलसचिव संदीप राठोड यांनी विद्यापीठाच्या समर इंटर्नशिप प्रोग्राम विषयी माहिती दिली तसेच मेंटल प्रिपरेशन फॉर कॉन्सस्ट्रेशन विषयावर श्रीमती मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. निलीमा क्षीरसागर, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे डॉ.दिलीप त्रिवेदी, प्राचार्या श्रीमती शिल्पा शेट्टीगर, श्री. मिलिंद काळे, श्री. आशिष, श्रीमती मानसी भगत, श्री. गोरीवाले, ब्रिगे. सुबोध मुळगुंद, सहायक कुलसचिव श्री. संजय देशमुख, डॉ. गौरांग बक्षी, डॉ. शृंखला कौशिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. अविनाश सोनवणे, श्री. अर्जुन नागलोथ, श्री. घनःशाम धनगर, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. सोहम वानेरे, श्री. अब्दुल खान यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील एकशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.