इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियाचा वापर सध्या खुपच वाढला आहे. मात्र, याच सोशल मिडियाला चोरांनी आपले शस्त्र बनविले आहे. सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टींसाठी वापर होत असताना काही जण त्याचा गैरफायदा घेतात. त्यातूनच सायबर क्राईमच्या प्रकार घडत आहेत. भारतात व्हॉट्सअप हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. परंतु एका शिक्षिकेला व्हॉटसअॅपवर आलेला एक संदेश खूपच महागात पडला आहे. कारण व्हॉट्सअॅप वर आलेली लिंक उघडताच या शिक्षिकेचे बँक खातेच रिकामे झाले. आंध्र प्रदेशातील अण्णामय्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वरलक्ष्मी असे या निवृत्त शिक्षिकेचे नाव असून, त्यांना मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात एक लिंक दिलेली होती. वरलक्ष्मी यांनी ती लिंक उघडताच त्यांचा फोन हॅक झाला. त्यांच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये काढून घेण्यात आले. इतकी मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरलक्ष्मी यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत. अज्ञात व्यक्तींनी वरलक्ष्मी यांच्या बँक खात्यातून आधी २० हजार, मग ४० हजार रुपये व त्यानंतर ८० हजार रुपये काढले. मग टप्प्याटप्प्याने एकूण २१ लाख रुपयांवर डल्ला मारला.
या घटनसंदर्भात पोलीस अधिकारी मुरलीकृष्णा यांनी सांगितले की, अण्णामय्या जिल्ह्यातील मदनपल्ली येथील रहिवासी असलेल्या निवृत्त शिक्षिका वरलक्ष्मी यांनी व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशाबरोबर असलेली लिंक अनेकदा उघडली. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले. त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या प्रकारानंतर काही वेळाने खात्यातून २१ लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना एसएमएस आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली. आता पोलीस काय तपास करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
Alert WhatsApp Link Cyber Crime Bank Account Empty