पुणे – दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते, त्यामुळे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकानेच ते प्राशन केले, तर त्यामुळे आरोग्य चांगले राहते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. परंतु अलीकडच्या काळात दुधाऐवजी चहा आणि कॉफीचा वापर वाढला आहे. मात्र त्यासाठी घरोघरी दूध आणण्यात येतेच, दूध घरी आणल्यावर वारंवार तापविल्याने किंवा उकळल्याने त्यातीत पोषक घटक नष्ट होतात.
आपल्याकडे घरी दूध येताच ते प्रथम उकळले जाते. कारण भारतात दूध पिण्यापूर्वी उकळण्याची परंपरा आहे. कारण दूध गरम केल्याने सर्व जंतू नष्ट होतात आणि ते जास्त काळ साठवले जाऊ शकते. त्यामुळे कच्चे दूध बहुतेक घरांमध्ये मिळत नाही, सध्याच्या काळात घरोघरी पॅकेज्ड दूध येते, कारण त्याचा दर्जा चांगला आणि किंमतही माफक असते. पण दूध किती वेळा उकळणे योग्य आहे हे माहीत करून घेणे आवश्यक आहे.
दुधात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी आढळतात, त्यामुळे रोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला उर्जा तथा ताकद मिळते आणि हाडे मजबूत होतात.
एका संशोधनानुसार, दूध पुन्हा पुन्हा उकळणे योग्य नाही. त्यामुळे जीवनावश्यक पोषक तत्वे कमी होऊ लागतात. त्याच वेळी, अनेकांचा असा गैरसमज आहे की, दूध वारंवार उकळल्याने त्यातील पोषक घटक वाढतात. मात्र दूध पुन्हा पुन्हा उकळल्याने पोषक तत्वे संपुष्टात येऊ लागतात.
हे लक्षात ठेवा
– दूध गॅसवर ठेवेल तोपर्यंत चमच्याने सतत ढवळत राहावे. यानंतर दुधाला उकळी येताच गॅस बंद करावा. दूध एकाच वेळी उकळवा म्हणजे त्यातील पोषक घटक असतील. तसेच रात्री जेवण झाल्यावर दूध प्यायचे असेल तर पोटभर जेवू नका. दुधासाठी जागा सोडा नाहीतर पचनाशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात.
– वांगी किंवा कांद्यासोबत दूध कधीही खाऊ नका. यामुळे आपण त्वचेच्या आजारांना बळी पडू शकता. जेवण झाल्यावर लगेच दूध पिऊ नये. अन्न खाल्ल्यानंतर नेहमी एक तासा नंतर दूध प्यावे, असे आरोग्य व आहार तज्ज्ञ सांगतात.