विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्वसामान्य भारतीय माणूस वाढत्या महागाईला तोंड देत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने काही दिवसापूर्वीच शंभरी पार केली असताना आता डिझेलची किंमत देखील शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून या दरवाढीबद्दल असंतोष व्यक्त होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्य ग्राहकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. सोमवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आता राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख या आठ राज्यांमध्ये पेट्रोलची किरकोळ किंमत १०० रुपये प्रति लीटरवर गेली आहे. तर महानगर मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये पेट्रोलने यापूर्वीच प्रतिलिटर १०० रुपये ओलांडले आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमत अनेक राज्यात आणि काही शहरात १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर मेपासून आतापर्यंत डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७ रुपये १९ पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पेट्रोल प्रति लिटर ६ रुपये ९० पैशांनी महागले आहे.
आज देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सुमारे १०० दराने विकले जात आहेत. इंदूर, भोपाळ, परभणी, जयपूर, मुंबई आदि शहरात पेट्रोलचा दर साधारणतः १०० ते १०८ रुपये प्रतिलिटर आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर हा पेट्रोल प्रति लिटर १०० रुपये पार करणारा देशातील पहिला जिल्हा आहे. येथे फेब्रुवारीत पेट्रोल १०० रुपये होते. तर डिझेलने प्रतिलिटर १०० रुपये ओलांडले. आता पेट्रोल प्रति लिटर १०८.३७ रुपये तर डिझेल १०१.१२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅटचा दर सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा क्रमांक लागतो.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांनी व्हॅट काढून टाकले गेले असते तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपये विकले जाऊ शकते. परंतु ते केंद्र असो वा राज्य सरकार, दोघेही कर काढून घेऊ शकत नाहीत. कारण कारण त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग येथूनच येतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांच्या आधारे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुधारणा करतात.
अशी जाणून घ्या किंमत
एसएमएसद्वारे आपण आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकतो. त्यासाठी हे करा : इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक आरएसपी <डीलर कोड> 9224992249 नंबरवर पाठवू शकतात आणि एचपीसीएल (एचपीसीएल) ग्राहक एचपीपीआरआयएस <डीलर कोड> 9222201122 वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहक आरएसपी <डीलर कोड> 9223182222 या क्रमांकावर पाठवू शकतात.