नवी दिल्ली – हेलिकॉप्टर असो की, विमान , हवेत उडत असल्याने एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाला धोका असतो, त्यात थोडा जरी तांत्रिक बिघाड झाला तर अपघात होऊ शकतो. मात्र काही वेळा विमान उड्डाणप्रसंगी किंवा विमान धावपट्टीवर उतरतांना देखील अपघात होण्याची शक्यता असते. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या विमानातील प्रवाशांना दीड तास विमानातच अडकून पडावे लागले. दिल्लीच्या धावपट्टीवर उतरूनही ४५ मिनिटे त्या विमानाचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे विमानात गोंधळ उडाला. रायपूरहून दिल्लीला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचे दार न उघडल्याने एका प्रवाशाची प्रकृती खालावल्याने प्रवाशांचा त्रास वाढला. मात्र, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमान कंपन्यांनी माफी मागितली आहे.
याच विमानात बसलेले विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही याबाबत इंडिगो एअरलाइन्स आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांकडे ट्विटरवरून तक्रार केली. तसेच विमानाच्या आतून एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. बन्सल यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेनऊ वाजता विमानाने रायपूरहून दिल्लीला उड्डाण केले. रायपूरमध्येच विमानाला कोणतेही कारण न देता अर्धा तास उशीर झाला. तसेच विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना ४५ मिनिटे विमानातच थांबावे लागले.
जहाजावरील क्रूकडून विलंबाचे कारण विचारले असता, स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नाही. काही वेळा ग्राऊंड स्टाफ क्लिअरन्स नसल्याचे सांगून टाळाटाळ करत होता. त्यामुळे प्रवाशांच्या अडचण वाढली होती. तर दुसरीकडे ट्विटरवरच इंडिगोने या संपूर्ण प्रकरणावर विनोद बन्सल यांना उत्तर देताना खेद व्यक्त केला आहे.