इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी हे एसीसी आणि अंबुजा नंतर आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी करू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या संपूर्ण करारावर नजर ठेवणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, अदानी समूह येत्या काही दिवसांत कर्जबाजारी कंपनी जय प्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड खरेदी करू शकतो. दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणीही सुरू झाली आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या संपूर्ण प्रकरणाचे निरीक्षण करणाऱ्या एका व्यक्तीच्या मते, अदानी समूह ५० अब्ज रुपयांना (६०६ दशलक्ष डॉलर) जय प्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड खरेदी करू शकतो. अदानी समूहाने यावर्षीच अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी लि.चे अधिग्रहण पूर्ण केले आहे. अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांची एकत्रित स्थापित क्षमता वार्षिक ६७.५ दशलक्ष टन आहे. २०५० पर्यंत या क्षेत्राची झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळेच अदानी समूह एकामागून एक असे मोठे खरेदी करत आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत अदानी समुहाने म्हटले आहे की, निग्री सिमेंट ग्राइंडिंग युनिट आणि कंपनीच्या इतर नॉन-कोअर मालमत्तांचे निर्गुंतवणूक करण्याची योजना आहे. या माहितीनंतर सोमवारी कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे. अदानी समूहाचे सर्वात मोठे अधिग्रहण एसीसी आणि अंबुजा सिमेंटमध्ये होते. देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विलीनीकरण आणि अधिग्रहण करार होता. हा करार पूर्ण झाल्यानंतर, अदानीकडे अंबुजा सिमेंट्समध्ये ६३.१५ टक्के आणि एसीसी मधील ५६.६९ टक्के हिस्सेदारी (अंबुजा सिमेंटद्वारे ५०.०५ टक्के हिस्सेदारी) असेल. या संपादनाचे एकूण मूल्य ६.५० अब्ज डॉलर होते.
After ACC and Ambuja Adani Group Will buy this Cement Company