इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर या देशामध्ये सुधारणा होण्याऐवजी तेथील परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. देशांमधील अनेक नागरिक अन्नासाठी वणवण भटकंती करत असून दोन वेळच्या भाकरीसाठी अनेक जण स्वतःची किडनी विकण्यास तयार आहेत, तर काही जण आपल्या पोटच्या लहान मुलांची देखील विक्री करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते.
अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. नागरिकांकडे ना नोकऱ्या आहेत ना कमाईचे साधन आहे, अनेकांकडे जगण्यासाठी आणि पोटाची भूक भागवण्यासाठी स्वतःची लहान मुले आणि आपल्या शरीराचे अवयव विकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः उत्तरेकडील बल्ख, सार-ए-पुल, फरियाब आणि जवाझान प्रांतांमध्ये रिपब्लिकन सरकार पडण्यापूर्वी इस्लामिक अमिराती आणि माजी सरकारी सैन्यांमधील जोरदार संघर्षातून विस्थापित कुटुंबे वाचली. या कुटुंबांची अवस्था बिकट होत चालली आहे. धर्मादाय समिती विस्थापित कुटुंबांना त्यांची मुले आणि किडनीची विक्री थांबवण्यासाठी अन्न आणि रोख मदत करत आहे.
एका अहवालानुसार, एका मुलाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एका किडनीची किंमत अंदाजे दीड लाख रुपये आहे. बल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ येथील छावणीत अनेक गरीब कुटुंबे राहत आहेत. गरिबी, देशातील आर्थिक समस्या तसेच कोविड-19 चा उद्रेक यामुळे त्यांना असे निर्णय घेणे भाग पडले असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच या अहवालानुसार, प्रत्येक कुटुंबात सुमारे दोन ते सात मुले आहेत आणि एका धर्मादाय समितीने या कुटुंबांना मुले आणि किडनी विकणे थांबवण्यास मदत केली. धर्मादाय समितीने मजार-ए-शरीफमधील हजारो विस्थापित आणि असुरक्षित नागरिकांना रोख मदत आणि अन्न पुरवले जात आहे.