इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता नवीनच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. अभिनेत्री नोरा फतेहीने दिल्ली न्यायालयात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि काही मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जाणूनबुजून आपलं नाव घेतलं जात असल्याचे नोराचे म्हणणे आहे.
‘सुकेशसोबत माझे थेट कोणतेही संबंध नव्हते. मी लीना मारिया पॉलच्या माध्यमातून त्याला ओळखत होते, असे नोराने स्पष्ट केले आहे. माझी थेट ओळख नसल्याने मी त्याच्याकडून कोणत्याच भेटवस्तूदेखील स्वीकारल्या नसल्याचे नोराचे म्हणणे आहे. माझी भूमिका स्पष्ट असताना मीडिया ट्रायलमुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचतोय असे नोराचे म्हणणे आहे.
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या निशाण्यावर जॅकलिन आणि नोरा या दोघीही आहेत. ईडीकडून अनेकदा या दोघींची चौकशी झाली. नोरावरही सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. मात्र, चौकशीदरम्यान नोराने हे आरोप फेटाळले आहेत. तर दुसरीकडे नोराचा भावोजी बॉबी याला सुकेशने ६५ लाखांची बीएमडब्ल्यू भेट दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, चौकशीदरम्यान सुकेशने दिलेली ऑफर नोराने नाकारली. काही काळानंतर नोराने सुकेशचा नंबर ब्लॉक केला होता.
ईडीच्या चौकशीदरम्यान नोराने सांगितले की, एका कार्यक्रमात सुकेश चंद्रशेखर याच्याशी त्याची पत्नी लीनामार्फत आपली भेट झाली होती. लीनाने नोराला महागड्या ब्रँडची बॅग आणि आयफोन दिला होता. माझा पती सुकेश हा तुझा खूप मोठा चाहता असल्याचं तिने नोराला सांगितलं होतं. लीनानेच सुकेश आणि नोराची फोनवर चर्चा घडवून आणली होती.
नोराने जॅकलिनवर जरी आरोप केले असले तरी जॅकलिन अजूनही शांत आहे. तिने कधीच माध्यमांसमोर नोराविषयी कोणतंच वक्तव्य केलं नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ती तिच्या वक्तव्यांबद्दल प्रचंड सावधगिरी बाळगत असल्याचे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. आम्हाला नोराकडून कोणत्याही प्रकारची मानहानीची नोटीस आलेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीर पद्धतीने त्याला उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले.
Actress Nora Fatehi Serious Allegation on Jacqueline Fernandez
Entertainment Money Laundering ED Enquiry Bollywood