मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिरोईन म्हणजेच अभिनेत्री यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली, तरीही त्यामध्ये काही अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा रसिकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला. यामध्ये प्रामुख्याने एका अभिनेत्रीचे नाव घेण्यात येते, ती म्हणजे मधुबाला होय, आरस्पाणी सौंदर्य जणू काही ‘चांद का तुकडा ‘ असे जिला म्हटले जात होते, ती अभिनेत्री मधुबाला त्या काळातील अनेकांच्या काळजाची धडकन होती.
मधुबाला त्यांच्या काळात मोठ्या पडद्यावर सौंदर्याच्या मूर्तीपेक्षा कमी नव्हती. असे अनेक स्टार्स तथा अभिनेत्री यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, पण मधुबालाला टक्कर देऊ शकले नाही. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिच्या निधनाने अनेक प्रियजनांना प्रचंड दुःख झाले. तिच्या कारकिर्दीत तिचे नाव अनेकांशी जोडले गेले. त्यापैकी मोठे नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आहे. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा आणि किस्से आजही रसिकांच्या जिभेवर आहेत. त्यांचे नाते नऊ वर्षे टिकले. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते, पण मधुबालाचे लग्न प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याशी झाले. दिलीप आणि मधुबालाचे यांचे नाते मधुबालाच्या वडिलांना मान्य नव्हते. दोघांचे एकत्र काम करूनही त्यांना खटकायचे. शूटिंगच्या वेळीही त्याचे वडील दोघांवर लक्ष ठेवून असत. एक काळ असा होता जेव्हा बीआर चोप्राने नया दौर या चित्रपटासाठी मधुबाला आणि दिलीप कुमार यांना कास्ट केले होते. दोघांनाही चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशात जावे लागले आणि मधुबालाचे वडील त्यांना परवानगी देत नव्हते. मात्र त्यामुळे बीआर चोप्राला मधुबालाऐवजी पुन्हा वैजयंतीमालाला कास्ट करावे लागले.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वर्तमानपत्रात मधुबालाचा फोटो छापण्यात आला. त्यानंतर तिच्या जागी वैजयंतीमाला यांचा फोटो घेण्यात आला. हे प्रकरण इतके बिघडले की मधुबालाने हा मुद्दा कोर्टात खेचला. त्यासाठी दिलीप कुमार यांनाही साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहावे लागले. त्यामुळे दोघांमध्ये आणखी फूट पडली आणि लवकरच ते वेगळे झाले. मधुबालाने किशोर कुमारसोबत ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकीट’ सारख्या चित्रपटात काम केले. दरम्यान, दोघेही प्रेमात पडले. एके दिवशी किशोर कुमारच्या सांगण्यावरून मधुबालाने लग्नाला होकार दिला. किशोरचे या अभिनेत्रीवर इतके प्रेम होते की त्यांनी धर्म बदलला आणि नावही बदलले, असे म्हणतात, दोघांचे लग्न झाल्यानंतर काही वेळातच मधुबालाला हृदयविकार झाल्याचे समजले. दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर मधुबालाने वयाच्या ३६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.