नवी दिल्ली – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनोळखी व्यक्तीकडून घेतलेले महागडे गिफ्ट तिला चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात जॅकलिनबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
आरोपपत्रातील माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मैत्री करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाच्या क्रमांकावर (स्पूफ करून) फसवणूक करून तो तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील सदस्य असल्याचा दावा केला होता.
ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला विशेष धनशोधन निवारण अधिनियम (पीएमएलए) अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात चंद्रशेखर, त्याची पत्नी लिना मारिया पॉल आणि इतर सहा जणांचा उल्लेख केला होता. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. असा खुलासा ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविषयी केला आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जॅकलिनने त्याला उत्तर दिले नाही. कारण तिला अनेक कॉल आले होते. संबंधित व्यक्ती कोण होता हे तिला ठाऊक नव्हते. जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शान मुथाथिलला एका सरकारी कार्यालयाच्या क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. जॅकलिनने चंद्रशेखरला संपर्क करायला पाहिजे. कारण तो एक महत्त्वाचा व्यक्ती असून, त्याला जॅकलिनसोबत बोलण्याची इच्छा आहे, असे त्या कॉलवर सांगण्यात आले.
आरोपपत्रानुसार, अनेक हिंदी चित्रपटात काम केलेल्या श्रीलंकेची नागरिक असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने नंतर ठग चंद्रशेखरशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने तिला सन टीव्हीचा मालक असल्याचा परिचय करून दिला. तो चेन्नई येथील रहिवासी असून तो जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातून येतो असेही त्याने सांगितले. जॅकलिनचे दक्षिणेत अनेत प्रशंसक असून, तिने दाक्षिणात्य चित्रपटात काम करायला हवे. सन टीव्हीकडे तिच्यासाठी अनेक योजना आहेत, असाही दावा चंद्रशेखरने केला होता.
सुकेशने दिल्या महागड्या भेटवस्तू
मेकअप आर्टिस्टने चंद्रशेखरचा मोबाईल नंबर फर्नांडिसला दिला. त्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क केला होता. जॅकलिनने ऑक्टोबरमध्ये ईडीकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटले होते की, सुकेशकडून तिला अनेक भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यामध्ये दागिने, चॅनलच्या तीन डिझायनर बॅग, जिममध्ये परिधान करणारे दोन पोशाख, लुईस व्हिटन बुटाचा एक जोड, हिर्याचे दोन जोड झुमके, बहुरंगी दगडांची एक बांगडी आणि हेमिज बांगडीचा समावेश आहे.
अभिनेत्री फर्नांडिसने आपल्या जबाबात म्हटले होते की, ती चंद्रशेखरला शेखर रत्न वेला या नावाने ओळखत होती. त्याने तो सन टीव्हीचा मालक असल्याचेही तिला सांगितले होते. सुकेशने जॅकलिनची बहिण गेराल्डिन फर्नांडिस हिला दीड लाख अमेरिकी डॉलर उधार दिले होते, हे सुद्धा जॅकलिनने मान्य केले होते.