मुंबई – अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे. मोलकरणीला कामावर येण्यास उशीर झाल्यामुळे अभिनेत्रीने अल्पवयीन मोलकरणीला सँडलने मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशीरा कामावर येऊन वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने या अल्पवयीन मुलीवर हल्ला केला. ही संशयित आरोपी अभिनेत्री मुंबईतील वर्सोवा परिसरात राहते, त्यामुळे वर्सोवा पोलिसांनी तिला अटक केली आहे.
विशेष म्हणजे ही अभिनेत्री तिच्या वर्सोवा फ्लॅटमध्ये एकटीच राहते, परंतु तिने पीडित मुलीवर अनेकदा अत्याचार केले आहेत. नीट काम करत नसल्याचे सांगत तिला अभिनेत्रीने मारहाण केली आहे. पीडितेने आतापर्यंत कधीही याबद्दल तक्रार केली नव्हती, परंतु यावेळी अभिनेत्रीने तिला मारहाण केली तसेच फोटो व व्हिडिओसाठी तिचे कपडे काढण्यास सांगितले. दरम्यान, पीडितेचे म्हणणे आहे की, तिला आरोपी अभिनेत्रीने सँडलने मारहाण केली, तर तिच्या कपाळावरही जखम झाली आहे. त्यामुळे पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पीडितेची जखम पाहून तिच्या बहिणीने तिला विचारले, त्यानंतर अल्पवयीन मुलीने सर्व काही सांगितले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या संदर्भात असेही सांगण्यात येत आहे की, अभिनेत्रीला माहीत होते की, ती ज्या मुलीला घरकामासाठी ठेवत आहे ती अल्पवयीन आहे, त्यानंतरही तिला काम करायला लावले होते. आता अभिनेत्रीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.