अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात सीबीएस ते मेहर सिग्नल दरम्यान झाला होता. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारावर उपचार सुरू होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. निशांत रमेश पगारे (२३ रा.पिंपळनेर ता.साक्री,धुळे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पगारे गेल्या १४ जून रोजी रात्री सीबीएसकडून अशोक स्तंभाच्या दिशेने एमएच ०४ केजी ५९६५ या आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने पगारे दूरवर फेकला जावून गंभीर जखमी झाला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. २१ जून रोजी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी निखील संधानसी (रा.महाराणा प्रताप चौक,सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.
……
भिंत कोसळली जेसीबी चालकावर गुन्हा
नाशिक : वाड्याची भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्याप्रकरणी जेसीबी चालकाविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.३) घनकर लेन भागात घडली होती. संजय जोशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत जेसीबी व पोकलेन आॅपरेटरचे नाव आहे. घनकर लेन येथील जोशी वाड्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. रविवार कारंजा परिसरातील वैश्यवाडा आणि जोशी वाडा या दोन्ही वाड्यांची एकत्रीत भिंत असून एका वाड्याचे काम करतांना आजू बाजूच्या वाड्यांचा विचार न करता व कोणत्याही उपाययोजना न करता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत असतांना ही घटना घडली होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खोदकाम सुरू असतांना वैश्यवाड्याची एकत्रीत भिंत कोसळली होती. त्यात संगिता आणि रितू वैश्य या दोन महिला जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.