ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोबिंवलीतील संदप गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गावाजवळ असलेल्या खदानीच्या तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. ज्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे ते पोलिस पाटील यांचे कुटुंब आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गायकवाड हे पोलिस पाटील तसेच दिसले गावचे सरपंच आहेत. त्यांच्या कुटुंबातील त्यांची आई, सून आणि तिन्ही नातवंडे असे पाच जण दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी घराबाहेर निघाले. गावालगत असलेल्या खदानीच्या तलावात ते कपडे धुण्यासाठी पोहचले. या पाच पैकी एका जणाचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. तो बुडत असल्याचे पाहून अन्य चार जणांना त्याला वाचविण्यासाठी पाण्याकडे धाव घेतली. मात्र, या पाचही जणांना पोहता येत नसल्याने अखेर पाचही जणांचा पाण्याच बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल पाच जण बुडून मृत झाल्याने संदप गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी उशीरा या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.