इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून सुमारे पाच वर्षांपूर्वी इंग्लंडला पळून गेलेला भामटा व फरारी उद्योजक विजय मल्ल्या याला चांगलाच दणका मिळाला आहे. ब्रिटनमधील लंडन कोर्टाने त्याला आता लंडनमधील आलिशान बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.
इंग्लडमधील मल्ल्याविरुद्धचा खटला यूबीएस बँकेने जिंकला आहे. न्यायालयाने हा बंगला बँकेला देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्याचा मुलगा आणि त्याची आई देखील मल्ल्यासोबत या आलिशान बंगल्यात राहतात. भारतात किंगफिशर एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रकरणात स्वत:च्या संपूर्ण मालमत्तेची माहिती सादर न करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याबद्दल मल्ल्या याच्या विरोधात लवकरच निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मल्ल्याविरुद्ध अवमान प्रकरण दाखल करून घेतले होते. सदर प्रकरण हे २०१७ पासून सुरू असून, त्याआधीपासूनच विजय मल्ल्या फरार आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये असून त्याला प्रत्यार्पण कारवाईद्वारे हजर होता येईल.
इंग्लडमधील वास्तव्यात विजय मल्ल्या यांनी आपला बंगला यूबीएस बँकेकडे गहाण ठेवला होता. मात्र आता न्यायालयाने बँकेला या बंगल्याचा अधिकार दिला असून, त्यानंतर बँकेला या बंगल्याची मालकी मिळाली असून आता बँक तो विकू शकते. विजय मल्ल्याच्या बेदखल आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज ब्रिटिश न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे. भारतातील अनेक बँकांची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या मल्ल्या याच्या मालमत्ता या केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्या असून, त्यातून देशातील बँकांनी आतापर्यंत १३ हजार १०९ कोटी वसूल केले आहेत. तरीही अद्याप भारतीय बँकांचे कर्ज व त्यावरील व्याज मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपये देणे आहे. विजय मल्ल्या हा भारतातून मार्च २०१६ मध्ये ब्रिटनला पळून गेला होता.
कोट्यावधीच्या कर्जाचा गैरवापर आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी तो भारतात हवा असून हे कर्ज अनेक भारतीय व परदेशी बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला दिले होते. मल्ल्या आणि त्यांची आता बंद पडलेल्या कंपनीवर ६,२०३ कोटी रुपयांचा हिस्सा देणे बाकी आहे. स्विस बँकेसोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात मल्ल्याचे घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मल्ल्या यांनी केली होती.
लंडन उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागाचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मल्ल्या कुटुंबाला थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचे कोणतेही कारण नाही. याचा अर्थ मल्ल्याला या मालमत्तेतून बेदखल केले जाऊ शकते. मल्ल्याला स्विस बँकेचे २०४ दशलक्ष पाउंडचे कर्ज परत करावे लागणार आहे. लंडनच्या रीजेंट पार्क परिसरात असलेल्या व जप्ती केलेल्या या आलिशान घरात विजय मल्ल्या राहत होता. मल्ल्या ताबडतोब घरातून बाहेर पडला नाही तर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून त्याला जबरदस्तीने घराबाहेर हाकलून दिले जाऊ शकते.