देवळाली कॅम्प, भगूर परिसरात घटस्थापना साधेपणाने

नाशिक – कोरोनाच्या संकटामुळे भगूर व देवळाली गाव परिसरात अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. रेणुकादेवीच्या मंदिरातही साधेपणाने घटस्थापना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा अधिक उत्साह नाही.
  भगूरची रेणुकामाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर येथे पहाटे ५ वा. दुग्धाभिषेक व शृंगार करत मंदिराचे विश्वस्थ व पुजारी देविदास चिंगरे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी पुजारी कविता चिंगरे यांच्या हस्ते घटस्थापना तर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे पाच वाजेला आरती करण्यात आली. माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी मंदिरात प्रमोद आडके व गोरक्षनाथ गाढवे यांनी सपत्नीक घटस्थापना केली. येथील लामरोड युवक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे खंडन होऊ नये म्हणून दस्तगीर बाबा परिसरात असलेल्या गोडसे मळा येेेेथे पेमगिरी येथील पेमामाता शक्तीपीठ मूर्तीची स्थापना करण्यात आली.
देवळालीची माताराणी म्हणून श्रीनी बोर्ड यांच्या वतीने घरातच पूजाविधी करण्यात आला. गवळीवाडा येथील शितळामाता मंदिर, गुरुदावारारोडवरील महालक्ष्मी मंदिर येथे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रकाश काळोखे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी रामचंद्र सकट,जगन भालेकर,रवींद्र अडांगळे,रवींद्र बोराडे आदी उपस्थित होते. चारणवाडी येथील पाषाण तरुण मित्र मंडळाकडून घटस्थापनेसह देवी मूर्तीची साधेपणाने स्थापना करण्यात आली. रेणुका माता मंदिर परिसरात पोलिसांच्या वतीने बेरिकेटिंग करण्यात आले आहे.दरम्यान पोलिस उपायुक्त विजय खरात व कॅन्टोन्मेंट बोर्डाचेे अधिकारी यांंनी भेट देऊन सूचना केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here