स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले राष्ट्रवादीत, भुजबळांच्या उपस्थितीत प्रवेश

नाशिक – राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी नाशिक येथील कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, अॅड.चिन्मय गाढे, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी शेतकरी नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवितांना प्रसंगी लाठ्या काठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे. सद्यातरी हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि जान असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचे असे त्यांनी सांगितले. हंसराज वडघुले हे अभियंता असून शासकीय सेवेत १४ वर्ष काम देखील केलं. त्यानंतर शेतकरी चळवळीत योगदानासाठी आपल्या पदाचा  राजीनामा देत स्व. शरद जोशी व राजू शेट्टी यांच्यासोबत काम सुरु केलं. माध्यम क्षेत्रात देखील साप्ताहिकाच्या संपादक पदी, नाशिक बाजार समितीचे संचालक, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत व्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करत शेतकरी कर्जमाफी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. राज्याच्या सुकाणू समितीत राज्यनियंत्रक पदावरून जबाबदारी पार पाडली. शेतकरी चळवळीत काम करत असतांना त्यांनी सातत्याने मोर्चे, आंदोलन, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला. त्यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या या ज्ञानाचा, अभ्यासाचा जनतेच्या हितासाठी वापर करून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी हंसराज वडघुले म्हणाले की, देशभरात राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ साहेबांनी केलेलं काम आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे. सामाजिक हिताच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करतांना तसेच अनेक संकटामध्ये भुजबळ साहेबांनी मदत केली. स्व.शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर काम केलं आहे. यापुढील काळात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब व छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हितासाठी व नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करू असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

भुजबळ यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत बच्छाव, राम निकम, शरद लभडे, रतन मटाले, मनोज भारती, निलेश बिरारे, शरद घुगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here