इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून अनेकांना चित्रविचित्र अनुभवाचा सामना करावा लागला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत होती. काहींचे जीव वाचले तर काही रुग्ण दुर्दैवी ठरले. असाच एक अनुभव मध्यप्रदेशातील रिवा येथील एका शेतकरी कुटुंबीयांना आला.
आठ महिन्यांपूर्वी कोरोनाबाधित झालेल्या येथील शेकर्याच्या उपचारासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु दुर्दैवाने शेतकर्याचा जीव वाचू शकला नाही. रीवा येथील शेतकरी धर्मजय सिंह यांना आठ महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये शहरातील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसात जास्त संसर्ग झाल्यामुळे त्यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल आठ महिने सुरू असलेल्या उपचारासाठी कुटुंबीयांनी ५० एकर जमीन विकली. परंतु धर्मजय यांचा जीव वाचू शकला नाही.
इंग्लंडचे डॉक्टरही हतबल
रीवाच्या रकरी गावात राहणार्या धर्मजय सिंह यांच्या उपचारासाठी देशातील अनेक ख्यातनाम डॉक्टरांसह इंग्लंडमधील डॉक्टर काम करत होते. परंतु कोणत्याही पद्धतीने त्यांचा जीव वाचवू शकले नाही. मंगळवारी रात्री धर्मजय यांनी प्राण सोडले. रकरी गावात धर्मजय यांना एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखत होते. मध्य प्रदेशच्या विंध्य परिसरात गुलाब आणि स्ट्रॉबेरीची शेती करून त्यांनी आपली ओळख बनवली होती.
दररोज तीन लाखांचा खर्च
२६ जानेवारी २०२१ म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एसएफ मैदानात धर्मजय यांचा गौरव केला होता. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर धर्मजय यांची प्रकृती दररोज ढासळत चालली होती. धर्मजय यांचे मोठे बंधू प्रदीप सिंह यांच्या माहितीनुसार, त्यांच्या उपचारावर जवळपास ८ कोटी रुपये खर्च झाले. त्यासाठी त्यांनी आपली ५० एकर जमीन विक्री केली. धर्मजय यांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडूनही चार-पाच लाख रुपयांची मदत मिळाली होती. परंतु त्यांच्या उपचाराचा दररोजचा खर्च एक ते तीन लाख रुपये होता.