नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – अगदी प्राचीन काळापासून ते मोहें-जो-दडो- हडप्पा आणि त्यानंतर अर्वाचीन हिंदूस्थान तसेच आधुनिक भारत या सर्व कालखंडामध्ये इसवी सन 1947 पर्यंत भारतीय उपखंडात अनेक अनेक महाराजे आणि सम्राट यांचे राज्य होते. सहाजिकच अगदी काबुल-कंधार पासून ते तंजावर व मद्रास पर्यंत संपूर्ण भूप्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या एकसंघ असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथील संस्कृती देखील एकच होती. 1947 मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, तरी त्यापूर्वी येथे अनेक मंदिरे होती. आताही मंदिरे उत्खननात आढळून येतात. अशाच प्रकारचे एक मंदिर नुकतेच पाकिस्तानात सापडले असून त्या काळातील अनेक मौल्यवान वस्तू देखील आढळले आहेत.
पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये 2,300 वर्षे जुने बौद्ध मंदिर शोधून काढले आहे. यासोबतच इतर काही मौल्यवान कलाकृतीही उत्खननात सापडल्या आहेत. सदर मंदिर हे खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बरीकोट तहसीलमधील बाजीरा शहरात बौद्ध काळातील सापडले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर असल्याचे म्हटले जाते.
या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान आणि इटालियन पुरातत्व शास्त्रज्ञांनी, वायव्य पाकिस्तान मधील एका ऐतिहासिक स्थळावर संयुक्त उत्खनना दरम्यान 2,300 वर्षे जुने बौद्ध काळातील मंदिर आणि इतर मौल्यवान कलाकृतींचा शोध लावला आहे. स्वातमध्ये सापडलेले हे मंदिर पाकिस्तानातील तक्षशिला येथील मंदिरांपेक्षा जुने असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथे मंदिराशिवाय पुरातत्व शास्त्रज्ञांनी ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळापासूनची नाणी, अंगठ्या, भांडी आणि खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह इतर 2,700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील जमा केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वात जिल्ह्यातील बाजीरा या ऐतिहासिक शहरात उत्खननादरम्यान आणखी पुरातत्व स्थळे सापडतील, असा विश्वास इटालियन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान मधील इटालियन राजदूत आंद्रे फेरारिस यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळे जगातील विविध धर्मांसाठी खूप महत्त्वाची आहेत.