नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच केली आहे. आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. भाजप नेते आणि अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही डिमांड स्लिप आणि ओळख पुराव्याशिवाय २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचा किंवा इतर लहान मूल्यांच्या नोटांमध्ये रोख रक्कम भरण्याचा आदेश अनियंत्रित, तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. यामुळे नोटबंदीचा उद्देश कसा सफल होईल. त्यामुळे सर्व माहिती भरुन घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की, लोकांच्या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा पोहोचल्या आहेत. तर उरलेला साठा फुटीरतावादी, दहशतवादी, माओवादी, ड्रग्ज तस्कर, खाण माफिया आणि भ्रष्ट लोकांचा आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटांचा सर्व तपशील घेणे आवश्यक आहे, असे उपाध्याय यांचे म्हणणे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांना केवळ संबंधित बँक खात्यांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. यामुळे काळा पैसा आणि बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांची सहज ओळख होईल. यासोबतच भ्रष्टाचार, बेनामी व्यवहार संपण्यास मदत होणार आहे.
उच्च मूल्याच्या नोटांमधील रोख व्यवहार हे भ्रष्टाचाराचे मुख्य स्त्रोत आहेत. या नोटांचा वापर दहशतवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद, कट्टरतावाद, जुगार, तस्करी, मनी लाँड्रिंग, अपहरण, खंडणी, लाचखोरी आणि हुंडा इत्यादी बेकायदेशीर कामांमध्ये केला जातो. हे पाहता आरबीआय आणि एसबीआयने हे सुनिश्चित करावे की २ हजार रुपयांच्या नोटा फक्त संबंधित बँक खात्यांमध्येच जमा केल्या जातील, असे याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत म्हटले आहे की, नुकतेच केंद्राने प्रत्येक कुटुंबाकडे आधार कार्ड आणि बँक खाते असण्याची घोषणा केली होती. मग आरबीआय २ हजारच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्याची परवानगी का देत आहे? दारिद्र्यरेषेखालील ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य मिळते हेही नमूद करणे आवश्यक आहे. अश्विनी म्हणाल्या की, आम्ही आरबीआय आणि एसबीआयला विनंती करतो की २ हजार रुपयांच्या नोटा फक्त बँक खात्यांमध्येच जमा केल्या जातील याची खात्री करण्यासाठी पावले उचलावीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा १९ मे रोजी केली. या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी जनतेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या सर्व स्थानिक मुख्य कार्यालयांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे की सामान्य लोकांना २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी एक फॉर्म आवश्यक आहे, म्हणजे २ हजार रुपयांच्या दहा नोटा एका वेळी एकूण २० हजार रुपयांपर्यंत बदलता किंवा जमा करता येतील. बँकेने २० मेच्या पत्रात म्हटले आहे की, ‘एक्स्चेंजच्या वेळी कोणताही ओळखीचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.
2 Thousand Notes BJP Leader PIL Delhi High Court