नाशिक : साथरोग निर्बंधांचे उल्लंघन करणा-या हॉटेलवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर ग्राहकांनी हल्ला केल्याची घटना इंंदिरा नगर मधील गुरूगोविंदसिंग कॉलेज भागात घडली. ग्राहकांचे छायाचित्र काढल्याने हा वाद झाला असून यात एका प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षकास बेदम मारहाण करीत ग्राहकांच्या टोळक्याने त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीप्रसाद जोशी (रा.चित्रकुट),संकेत चंद्रात्रे (रा.पांडवनगरी) व त्यांचे दोन साथीदार अशी मनपा कर्मचा-यांना मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी प्रभारी स्वच्छता निरीक्षक राहूल गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या पथकांकडून छापे टाकले जात असून, बुधवारी (दि.७) गुरूगोविंद सिंग कॉलेज परिसरातील हॉटेल कट्टीबट्टी सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पथकाने छापा टाकला असता ही घटना घडली.
वरिष्ठांच्या आदेशान्वये प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक रोहिदास निकम यांनी हॉटेलमधील ग्राहकांचे फोटो काढण्यास सुरूवात केली असता दोघा संशयीतांसह त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी निकम यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रसंगी निकम यांच्या समवेत असलेले स्वच्छता निरीक्षक अथर्व कदम यांच्या दुचाकीचेही टोळक्याने तोडफोड करीत नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.