नाशिक – लाॅकडाऊनमुळे रोजगार बंद पडलेल्या घरकामगारांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य ,मंडळासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी व गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली नोंदणी आणि नुतणीकरण सुरू करून कल्याणकारी योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सीटू प्रणित घर कामगार समन्वय समितीच्या वतीने भर पावसात नाशिक, इगतपुरी, मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
नाशिक कामगार उपआयुक्त कार्यालयावर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व घरकामगार संघटनेच्या नेत्या सिंधुताई शार्दुल, मोहन जाधव, तुकाराम सोनजे, निवृत्ती केदार यांनी केले. तर इगतपुरी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व सीटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, अशोक चव्हाण, विठोबा कातोरे, भाऊसाहेब जाधव, ज्ञानेश्वर काजळे, बाळू गवारी यांनी केले.
तसेच यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल. कराड व राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन पाठवून कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली.