हो, या अभिनेत्रीने नाकारला होता दादासाहेब फाळके पुरस्कार!

नवी दिल्ली – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडलेली जुन्या जमान्यातील अभिनेत्री म्हणजे सुचित्रा सेन. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील सर्वाेच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
सुचित्रा सेन या  आपली तत्त्वे, नियम पाळणाऱ्या, स्वाभिमानी अशा होत्या. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती केल्यावाचून त्या रहात नसत. २००५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी तो नाकारला होता. कारण थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांना कोलकाता सोडून दिल्लीला जावे लागणार होते, जे त्यांना मान्य नव्हतं. तसेच त्यांना सार्वजनिक ठिकाणी जायचे नव्हते. वास्तिवक, जेव्हा चित्रपटातून त्यांनी संन्यास घेतला तेव्हाच त्यांनी आपण लोकांत जाणार नसल्याचे  सांगितले होते. आपण ठरवलेली ही गोष्ट पूर्ण करण्यासाठीच त्यांनी चक्क हा पुरस्कारही नाकारला.

६ एप्रिल १९३१ रोजी सध्याच्या बांग्लादेशातील पबना जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव राेमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील हे मुख्याध्यापक होते. १९४७ मध्ये त्यांचा विवाह बंगालमधील प्रसिद्ध उद्योगपती आदीनाथ सेन यांचे चिरंजीव दीबानाथ सेन यांच्यासोबत झाला.
लग्नानंतर पाच वर्षांनी सुचित्रा यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. बांगला सिनेमातून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘शेष कोथाय’ हा तयार तर झाला पण या नावाने हा चित्रपट कधी प्रदर्शित झालाच नाही. त्याचवर्षी त्यांचा आणखी एक बंगाली चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सारे चतुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट मानला जातो. या चित्रपटात सुचित्रा सेन यांच्यासोबत उत्तम कुमार होते. या दोघांची जोडी सुपरहिट झाली. त्यानंतरही या जोडीने अनेक चित्रपट केले. सुचित्रा यांच्या ६१ चित्रपटांपैकी तब्बल ३०  चित्रपटांमध्ये हीच जोडी झळकली आहे. त्यांच्या कारकीर्दीतील ६१ चित्रपटांपैकी २० चित्रपट ब्लॉकबस्टर तर अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

१९७८ मध्ये त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला आणि रामकृष्ण मिशनच्या सदस्या झाल्या. १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारी ही पहिली बंगाली अभिनेत्री होती. १७ जानेवारी २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.