नाशिक – जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ््यातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना सिडकोतील महाराणा प्रताप चौकात घडली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री राजेंद्र कोळमकर (४८ रा.गणेश चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. जयश्री कोळमकर या रविवारी (दि.२५) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मुक्तांगण शाळेजवळून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या पल्सरस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
खुटवडनगर – बेडरूममधून सोनसाखळी लंपास
नाशिक – बंगल्याच्या उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी बेडरूममधून सुमारे ७० हजार रूपये किमतीची सोनसाखळी लांबविल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया जयवंत भदाणे (रा. आयकर कॉलनी, खुटवडनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.२३) रात्री ही घटना घडली. बंगल्याची खिडकी उघडी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी हात घालून भदाणे यांच्या बेडरूममधील टेबलावर काढून ठेवलेली सुमारे सत्तर हजार रूपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.
बजरंगवाडी – तरूणावर कोयत्याने हल्ला
नाशिक – रस्त्याने चालताना धक्का लागल्याच्या कारणातून एकास दोघांनी बेदम मारहाण करीत कोयत्याने हल्ला केल्याची घटना बजरंगवाडीत घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोघा भावांना जेरबंद केले आहे.
खंडेराव सुनील वाघमारे (२४) व विशाल सुनिल वाघमारे (२२, रा. आनंदनगर,बजरंगवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी गुलाम गौस जाकिर अन्सारी (रा.आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अन्सारी शनिवारी (दि.२४) रात्री कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. देवी मंदिरा जवळून जात असतांना अन्सारी यांचा संशयीतांपैकी एकास धक्का लागला. या कारणातून दोघा भावांनी अन्सारी यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत धारदार कोयत्याने अन्सारी यांच्या डोक्यात घाव घालण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
शिवाजीनगर – चॉपरचा धाक दाखवून चालकास लुटले
नाशिक – धावत्या वाहनात बसून भामट्यांनी चॉपरचा धाक दाखवित चालकाच्या खिशातील रोकड बळजबरी काढून नेल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत चारचाकी वाहन अडवे लावून छोटा हत्ती चालकास लुटण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश राजाराम म्हस्के व त्याच्या तीन साथीदारांनी ही जबरी लूट केल्याची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी शत्रुघ्न रामरतन गुप्ता (३१, रा. नांदुर नाका) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता शनिवारी (दि.२४) रात्री काम आटोपून पावभाजी घेण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. छोटा हत्ती (एमएच १५ एव्ही ४५४०) या वाहनातून ते प्रवास करीत असतांना नांदूरकर हॉस्पिटल समोर संशयीतांनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन गुप्ता यांच्या वाहनास अडवे लावले. यावेळी संशयीतांपैकी दोन जण चालक गुप्ता यांच्या वाहनात शिरले. चालकाच्या आसनावर आजूबाजूने बसत संशयीतांनी चॉपरचा धाक दाखवित त्यांच्या खिशातील आठ हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी संशयीतांनी पोलीसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
अपघातात दुचाकीस्वार ठार
नाशिक: पूढे जाणाºया कारने अचानक यू टर्न घेतल्याने भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला हा अपघात नाशिक पुणा मार्गावरील बिटको कॉलेज भागात झाला. याप्रकरणी कारचालकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ भिमराव कांबळे (३२, रा. माऊली हॉस्पिटल,अशोका मार्ग) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कांबळे रविवारी (दि.२५) रात्री एमएच १५ सीएन ९४१० या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. बिटको कॉलेजकडून तो नाशिकच्या दिशने प्रवास करीत असतांना गुरूद्वाराजवळ पुढे जाणाºया एमएच १५ ईबी ८२७९ या कारने अचानक यु टर्न घेतल्याने दुचाकी कारवर आदळली. या अपघातात सिध्दार्थ गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.