मावलीननाॅन्ग
आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ गाव अशी ओळख असलेल्या या गावाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पर्यटनासाठी गेल्यानंतर येथे मिळणारा नितांत आनंद हेच याठिकाणाचे मोठे वैशिष्ट्य आहे. तसेच, जीवन जगण्याची वेगळी परिभाषा सांगणारे हे गाव आपल्या चिरकाल स्मरणात राहतेच…

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ गाव हे भारतातील मेघालय या छोट्याशा राज्यात आहे. ही बाब आपल्या देशातील खूप कमी लोकांना माहित आहे. सन २००३ साली ऐका जागतिक नियतकालिकाने मावलीननॉन्ग या गावास आशियातील स्वच्छ गावाचा पुरस्कार दिला व या गावाची अर्थव्यवस्थाच बदलली. जगभरातून पर्यटक याठिकाणी भेट द्यायला लागले. घराघरात होम स्टे तयार झाले व तेथील नागरिकांनी आपल्या घरगुती जेवणाने सगळ्यांना अधिक आकर्षित केले. मात्र या इको फ्रेंडली गावाला भेट दिल्यानंतर आपली जगण्याची संकल्पनाच बदलली तर त्यात काही वावगे नाही.
मावलीननॉन्ग हे गाव मेघालयातील पुर्व खासी डोंगर भागात वसलेले ऐक टुमदार गाव आहे. या गावास GODS OWN GARDEN असेही संबोधले जाते. हे गाव मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाॅंगपासून फक्त ९० किलोमीटर अंतरावर आहे. गावाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी गावकर्यांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. शासकीय मदतीशिवाय संपूर्ण गाव रोज स्वच्छ ठेवायचा पणही केलेला आहे. येथे झाडांचा पडलेला पालापाचोळा व घरातील कचर्याची नीट विल्हेवाट लावणे, कचरा पेटीचा वापर करणे हे गावकर्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेले आहे. स्वच्छ व सुंदर रस्ते आणि घरांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी यामुळे गावाच्या सौंदर्यात भरच पडली आहे. महत्वाचे म्हणजे हे गाव बांगलादेशच्या सीमेपासून खूप जवळ आहे. पर्यटक वाढल्याने गावकर्यांचे उत्पन्न ६० टक्क्यांनी वाढले आहे. पावसाळ्यात तर या गावाचे सौंदर्य अधिक खुलते. मुळात वर्षभर असलेल्या आल्हाददायक हवामानामुळे याठिकाणी असंख्य प्रकारची फुले मोठ्या प्रमाणात येतात.

या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव शंभर टक्के साक्षर आहे. गावात सर्व जण अगदी सहज हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. या गावाने एखादे आदर्श गाव कसे आसावे याचे उदाहरणच तयार केले आहे. होय आणि तुम्ही कुठेही बघितली नसेल अशी शेती येथे होते. ती म्हणजे झाडू ज्या वनस्पती पासून बनतो ती ब्रुमग्रासची. ही झाडे लावून त्याची शेती येथे केली जाते. कदाचित त्यामुळेच हे छोटेखानी गाव सर्वात स्वच्छ असेल. अशा या वैविध्यपुर्ण गावास भेट दिल्यानंतर तेथील जनतेबद्दल आपल्या मनात आदर निर्माण होतो, हे नक्की.
कसे जाल
येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ तसे शिलाॅंग येथे आहे. पण, गोवाहाटी येथे जास्त फ्लाईटसचा पर्याय आहे. तसेच २४० किमीवर करिमगंज जवळचे रेल्वे स्टेशन आहे. शिलाॅंग येथून रस्ता मार्गे जाणे खुपच सुंदर आहे.
कुठे रहाल
या गावात अप्रतिम असे भरपूर होम स्टे आहेत. येथे राहण्यासारखे दुसरे सुख नाही. तसेच शिलाॅंग येथे अनेक अद्ययावत हाॅटेल्स आहेत.
खरेदी काय करावी
याठिकाणी बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने खरेदीस भरपूर व्हरायटी मिळते. शिलाॅंगचा पोलिस बाजार यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच लोकरीचे कपडे, शाॅल्स स्वस्त मिळतात.
काय बघाल
झाडांची मुळे एकमेकांत गुंतून नैसर्गिकरीत्या तयार झालेला लिवींगरुट ब्रीज तसेच भरपूर पाऊस पडणारे चेरापुंजी, डावकी नदी हे एक-दोन दिवसात बघून होते.
