पोर्तुगीज भाषा बोलणारे गाव कोर्लाई
आज आपण आपल्या जवळच्याच पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गाव परिसराच्या पर्यटनाची माहिती घेणार आहोत. केवळ समुद्र किनाऱ्यालगत असलेले एवढेच माहित असलेले कोर्लाई (अलिबाग) हे पोर्तुगीज भाषा बोलणारे गाव आहे. येथील पर्यटनाचा आनंद काही विरळाच आहे.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
आपली बोली, भाषा ही आपल्या प्रत्येकाला अत्यंत प्रिय असते. बर्याचदा या भाषेमुळेही आपली जगण्याची एक पद्धत ठरत असते. आपण जसे आपल्या पुढील पिढीला विचार, संस्कार देतो तसेच भाषाही वारशाने देत असतो. अशीच एक रचना करुन ठेवली आहे पोर्तुगीजांनी १५ व्या शतकात. त्यामुळे पोर्तुगीज आपल्या देशात जाऊन शेकडो वर्षे झाली तरी ते आपली भाषा एका महाराष्ट्रीयन गावात सोडून गेले आहेत.
महाराष्ट्रातील एका गावातील सर्व नागरिक पोर्तुगीज भाषा बोलतात, हे आपल्याला ऐकायला सुद्धा वेगळं वाटतं. खरे आहे ना. पण, होय हे खरं आहे. आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अलिबाग जवळ हे छोटेसे कोर्लाई गाव वसलेलं आहे. अलिबाग ते मुरुड या रस्त्यावर अलिबागपासून २२ किमी अंतरावर हे गाव आहे. याठिकाणी पोर्तुगीजांनी बांधलेला कोर्लाई किल्ला प्रसिद्ध आहे.
साधारण १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापार वाढीसाठी या मोक्याच्या जागेचे महत्व ओळखून येथे किल्ला बांधला आणि गावही वसविले. यामुळे वसई ते कोर्लाई पर्यंतचा परिसर सुरक्षित रहावा हा त्यांचा उद्देश होता. पोर्तुगीजांचे येथे दिर्घकाळ वास्तव्य राहिल्याने काहींनी येथेच स्थानिक महिलांशी विवाह केला. बरेच जण येथेच स्थायिक झाले. हे नागरिक पोर्तुगीज क्रीओल भाषा बोलत. त्यामुळे आजही येथे हीच पोर्तुगीज क्रिओल भाषा प्रमुख भाषा म्हणून बोलली जाते. अर्थात ही प्युअर पोर्तुगीज भाषा नसून यात काही मराठी शब्द मिक्स झालेले असले तरी व्यवहारात पोर्तुगीज भाषाच जास्त वापरली जाते.

कोर्लाई गाव तसे चार-पाचशे घरांचं छोटेखानी गाव, पण अलिबाग-मुरुड महामार्गावर असल्याने व ऐतिहासिक कोर्लाई किल्ला याठिकाणी असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. या गावातील गावकर्यांचे इतर सर्व व्यवहार आपल्या सारखे असले तरी भाषा आपल्यापेक्षा खूप वेगळी व आपल्याला न समजणारी आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांना आपल्या या आगळ्या वेगळ्या भाषेचे खुपच अप्रुप असून त्यांनी ती टिकवून ठेवली आहे.
कसे जाल
मुंबई पासून १५० किमीवर हे गाव असल्याने रस्ते, हवाई व रेल्वे मार्गाने सहज कोर्लाई येथे पोहचता येते. आपण जेव्हा रायगड परिसरात जाल तेव्हा वैशिष्ट्यपूर्ण गावास अवश्य भेट द्यावी आणि स्थानिक नागरिकांशी बोलावे.
काय बघाल
कोर्लाई गाव समुद्रकिनारी असल्याने नारळ-सुपारीच्या बागा, कोर्लाई किल्ला, काही चर्चेस व संपूर्ण अलिबाग-मुरुड जंजिर्याचा परिसर बघता येतो.
कुठे रहाल
या परिसरात असंख्य होम स्टे, हाॅटेल्स आहेत.


https://indiadarpanlive.com/?cat=22