पिंपळगाव बसवंत – शहरातील अंबिका नगर परिसरात घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिकानगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल या दोन गटात वाद झाला. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील दोघा बाप-लेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (वय ६७) व माणिक पुंडलिक शिंदे (वय ४०, रा. अंबिकानगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी उपचार सुरू असतांना या बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी विकी दत्तात्रय धाडीवाल (वय २७) व अजय प्रकाश धाडीवाल (वय १९, रा. अंबिकानगर, पिंपळगाव बसवंत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे करीत आहे.