मनमाड – राष्ट्र संत कैकाडी बाबांचे पुतणे हभप रामदास महाराज जाधव यांचे अकलूज मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले , ते ७२ वर्षांचे होते. त्यांचे मुळ गाव मनमाड होते. त्यांच्या निधनाने एक गाडगे महाराजांचे विचाराचे अनुयायी आणि परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिरानंतर सर्वात लोकप्रिय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो विविध काळातील प्रसंग मूर्त्यांची रूपाने उभारण्यात आला आहेत . स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ठ नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ याची ओळख आहे. वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणून उपचारासाठी अकलूज येथे दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची आज दुपारी ३.४० च्या सुमारास प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाचे वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.