लातूर – सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे, राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी देशमुख यांनी शिष्टमंडळाबरोबर सविस्तर चर्चा केली.
समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे. तमाशा परिषदेच्या समस्या जाणून घेतल्या त्या सर्व समस्या सोडवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळातील सदस्यांना दिले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, सुनिल वाडेकर, संभाजी जाधव, आनंद भिसे-पाटील आदींचा समावेश होता.