मनाली देवरे, नाशिक
…..
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज सनरायझर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि गुणांच्या टेबलमध्ये आपले खाते उघडले. या सामन्याचे ठळक वैशिष्ट्यं म्हणजे या सीझनच्या सलग सहाव्या सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला पराभवाची नामुष्की झेलावी लागली आहे. त्यामुळे ‘टाॕस जिंका, सामना गमवा’ ही २०२० च्या आयपीएलची टॕगलाईन होते की काय ? अशी शक्यता आता वाटू लागली आहे.
केकेआरचा फलंदाज शुभमन गिल संधीची वाट बघत होता. खास करून सलामीचा सुनील नरेन आणि कर्णधार दिनेश कार्तिक हे भोपळाही न फोडता तंबूत परतल्यानंतर सलामीच्या शुभमन गीलने एक बाजू लावून धरली. स्वतःला सिध्द करण्याची संधी त्याने सोडली नाही ६२ चेंडूत ७० धावा केल्या आणि एन.मॉर्गन, नितीश राणा यांच्या सहकार्याने १४५ धावांचे आव्हान अवघ्या या १८ षटकातच सहज पूर्ण केले.
सनरायझर्सचा धिमा खेळ
आज सनरायझर्स, हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टाॕस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. या संघाने निर्धारीत २० षटकात अवघ्या ४ बाद १४२ धावा केल्या. मनीष पांडेचे अर्धशतक आणि डेव्हिड वाॕर्नर (३६), वृद्धिमान साहा(३०) यांच्या व्यतिरिक्त फलंदाजीत फारसा कुणीही चमकला नाही.
दिनेश कार्तिकचे दमदार नेतृत्व
कमी धावसंख्येवर राजस्थानला रोखण्यामागे दिनेश कार्तिकची रणनीती उपयुक्त ठरली. त्यांचे मुख्य गोलंदाज फारसे महागडे ठरत नसताना देखील त्याने आज सात गोलंदाज वापरले. सुनील नरेन, पॕट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांनी किफायतशीर गोलंदाजी केल्यामुळे राजस्थान रॉयल संघाकडे ६ विकेट शिल्लक असतांना देखील १५० चा आकडा देखील पार करता आला नाही आणि मग धावांचा पाठलाग करतांना कोलकात्ता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना फारसे श्रम घ्यावे लागले नाही.
रविवारचा सामना
रविवारी राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोघांमध्ये लढत होईल. राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा के.एल. राहुल हे दोन्ही फलंदाज फॉर्मात आहेत. राजस्थान रॉयल साठी या सामन्यात जमेची बाजू अशी असेल की, ते या मोसमातला त्यांचा दुसरा सामना शारजा मध्येच खेळतील आणि विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स चा पराभव केला होता.