विष्णू थोरे, चांदवड
आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने,आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुणे, वास्तवाचा विस्तव किती भयाण असतो हे सांगणाऱ्या या कवितेच्या ओळी आहेत लोककवी प्रशांत मोरे यांच्या. या कवितेतील भयाण चित्र प्रत्यक्ष किती भयानक आहे हे नुकतेच विटावे येथील एका शेतकरी कुटुंबाला अनुभवायला मिळाले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने विटावे (ता.चांदवड) येथील अनिल रायाजी पवार या शेतकऱ्याचा संसार व शेती मातीसकट पुरात वाहून गेली.
घरात पाणी शिरू लागल्याने भेदरलेल्या या कुटुंबाने भर पावसात रात्री घर सोडले. पावसामुळे घराची भिंत खचली, संसार पुरात वाहून गेला. घर बांधण्यासाठी आणलेली वाळूही पाण्यासोबत वाहून गेली. त्याचबरोबर पवार यांची नऊ बिघे शेतातील मातीही पिका सकट वाहून गेली. आता शेतात फक्त दगडच उरले आहेत. त्यांनी नुकतीच सहा बिघे कांदा लागणही केली होती. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटाने या कुटुंबाचा धीर खचला आहे. पुरात वाहून गेलेल्या घरातील वस्तू शोधता शोधता त्यांच्या डोळ्यातही पूर आला.
या घटनेचा पंचनामा तलाठी व्ही.व्ही.राऊत यांनी केला असून चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर,तहसीलदार प्रदीप पाटील ,डॉ.आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल,डॉ.नितीन गांगुर्डे,नितीन आहेर आदींनी सदर शेतकऱ्याला भेटून परिस्थितीची पाहणी केली आहे. सदर शेतकरी कुटुंबाला या वेळी मदतीची गरज असून अनेक सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.
फोटो – बाबासाहेब कोल्हे